एकनाथ पाटील ।कोल्हापूर : मोबाईल एसएमएस, ई-मेल, फेसबुक, टीव्ही चॅनेल, आदी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक सुशिक्षित लोक टीव्ही, वृत्तपत्रांतील बोगस जाहिरातींच्या आमिषाला बळी पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी फसवणूक होऊ नये यासाठी जागरुक राहिले पाहिजे.फे्रंडशिप क्लबतर्फे कॉलेज गर्लशी मैत्री करण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधा, अशी जाहिरात करून तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. आजही महाविद्यालयीन तरुण या जाहिरातींच्या आमिषांना बळी पडत आहेत. या फ्रेंडशिपसाठी अनेक तरुणांनी घरातील दागदागिने चोरून, प्रसंगी वडिलांच्या पॉकेटमनीतील पैसे घेऊन हौस भागविण्याचा प्रयत्न केला आहे. बिहार, झारखंड, दिल्ली येथून आलेले फोन हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे आहेत. बँक खाते दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे, कागदपत्रे गोळा करणारी तिसरीच व्यक्ती, प्रत्येक काम वेगवेगळ्या व्यक्तीकडे सोपविण्यात आले आहे. घरी येऊन केमिकलमध्ये सोने पॉलिश करून देतो, असे सांगून सोने लुबाडले जाते. मोबाईलवर लॉटरी लागली, असे सांगून खोटे फोन, कॉल, मॅसेज येऊ शकतात. टॉवर, विम्याचे आमिष, चेहरा ओळखा बक्षीस जिंका, नोकरीचे आमिष, कागदपत्राशिवाय, तारणाशिवाय कर्ज उपलब्ध रून देण्याचे आमिष, आपला विमा बंद झाला आहे, एजंट बदलायचा आहे का, विम्यावर बोनस हवा आहे का, हप्ता थकला आहे, अशा प्रकारचे फोन येऊन आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या आॅनलाईन फसवणुकीचे चॅनेल मोठे आहे. सायबर क्राईमबाबत आता नागरिकांनी जागरुक राहणे महत्त्वाचे ठरत आहे.
सोशल नेट बॅकिंगवर होणारी फसवणूकअनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये. त्याच्याशी कोणतीही व्यक्तिगत माहिती अथवा फोटोची देवाणघेवाण करू नये. या साईटवर माहिती किंवा फोटो शेअर करताना पूर्ण विचार करावा. सोशल साईटवरील कोणत्याही अमिषाला बळी पडू नका.
विवाहविषयक काळजीअशा संकेतस्थळावर अनोळखी हाय प्रोफाईल परदेशी व्यक्तीकडून मागणी येते. सदरची व्यक्ती स्वत: येत असल्याचे सांगून किंवा महागडे गिफ्ट पाठवून ते कस्टममध्ये अडकले असून, ते सोडविण्यासाठी वारंवार पैशांची मागणी केली जाते. हे पैसे अनोळखी बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले जाते. लग्नाचे आमिष दाखवून वैयक्तिकमाहिती किंवा फोटोची देवाणघेवाण करून त्याद्वारे ब्लॅकमेल केले जाते.एटीएमचा वापर असा करावाबॅक खाती आणि एटीएम संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती विचारत नाही. मोबाईलवर येणारे बँक मॅसेज काळजीपूर्वक वाचा. मोबाईलवर येणारे ओटीपी पासवर्ड सहा अंकी कोणालाही सांगू नका. एटीएममधून पैसे काढताना अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश करू देऊ नका. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वत: मशीनवर स्वाईप करावे. एटीएम कार्ड स्किमर मशिनमधून स्वाईप होणार नाही याची काळजी घ्यावी. बँक कार्डचा पासवर्ड गोपनीय ठेवा.