कोल्हापूर : रमणमळा येथे होणाऱ्या गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही मतमोेजणी केंद्रात व मतमोजणी परिसरात येण्यास मनाई असून निकालानंतर रॅली किंवा मिरवणूकदेखील काढता येणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
कोरोनामुळे सध्या जिल्ह्यात आपत्ती निवारण कायद्यांतर्गत जमावबंदी आदेश लागू आहेत, त्यामुळे उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांच्याव्यतिरिक्त मतमोजणी केंद्राबाहेर तसेच परिसरात मतमोजणी प्रक्रिया ऐकण्यासाठी कोणालाही थांबता येणार नाही. जमाव करता येणार नाही. तसेच अन्य कोणालाही लॉकडाऊनमध्ये विनाकारण शहरामध्ये प्रवेशबंदी असेल. नागरिकांनी सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप व स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून मतमोजणीचे निकाल घरबसल्या ऐकावेत. निकालानंतर कुठल्याही प्रकारची रॅली, मिरवणूक काढता येणार नाही. नियमाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
---