लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. माजी संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर यांची नावे निश्चित होती, मात्र प्रकाश पाटील (नेर्ली) व बयाजी शेळके (गगनबावडा) यांना अनपेक्षितपणे संधी मिळाली आहे. या नावांची घोषणा शुक्रवारी कसबा बावडा येथील बैठकीत करण्यात आली.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात आहे. नेत्यांचे वारसदार, मातब्बर चेहरेच रिंगणात राहणार हे जवळपास निश्चित होते. त्यानुसार दोन्ही गटांकडून पॅनेलची बांधणी सुरू आहे. मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र प्रकाश पाटील व बयाजी शेळके यांना लॉटरी लागली. सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन मंत्री पाटील यांनी विरोधकांना झटका दिला आहे.
‘ए. वाय.’ यांच्याकडून किसन चौगुले
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे स्वत: किंवा पत्नी यांना ‘गोकुळ’च्या रिंगणात उतरतील, अशी अटकळ होती. त्यात पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शक्यता बळावली होती. त्यांच्या उमेदवारीसाठी नेतृत्वाकडूनही दबाब होता, मात्र सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून त्यांनी किसन चौगुले (चाफोडी) यांचे नाव पुढे केले आहे.
संधी एकदाच मिळणार
‘गोकुळ’ला एकच वेळा संधी मिळणार आहे. पुढच्या निवडणुकीत मागणी करायची नाही, अशी स्पष्ट सूचना मंत्री सतेज पाटील यांनी संबधितांना दिल्या आहेत.