अंबाबाई गर्भकुटीत सीसीटीव्ही बसविण्यास पुजाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:42 PM2017-10-27T17:42:04+5:302017-10-27T17:49:18+5:30

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. यासंबंधी शुक्रवारी सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष महेश जाधव यांनी कॅमेऱ्यांना विरोध करणाऱ्या श्रीपुजकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करून त्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा सज्जड दम दिला.

Opposing priests to install CCTV in Ambabai pregnant | अंबाबाई गर्भकुटीत सीसीटीव्ही बसविण्यास पुजाऱ्यांचा विरोध

श्रीपुजक हटाव समितीचे शंभरहून कार्यकर्ते शिवाजी पेठेतील देवस्थान समितीच्या कार्यालयात दाखल झाले.

Next
ठळक मुद्देदेवस्थान समिती-श्रीपुजकांमध्ये जोरदार वादावादीफौजदारी दाखल करण्याचा समितीचा सज्जड दमगर्भकुटीत कॅमेऱ्यांना विरोध का?...अखेर कॅमेरे सुरू झालेश्रीपुजक हटाव समितीची आक्रमक ‘एन्ट्री’

कोल्हापूर , दि. २७ :  अंबाबाई देवीच्या सुरक्षिततेसाठी व गर्भकुटीतील आर्द्रता पाहण्यासाठी गुरुवारी बसविण्यात आलेल्या चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. यासंबंधी शुक्रवारी सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष महेश जाधव यांनी कॅमेऱ्यांना विरोध करणाऱ्या श्रीपुजकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करून त्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा सज्जड दम दिला.


अंबाबाई देवीच्या गर्भकुटीत मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे देवीच्या सुरक्षिततेसाठी व आतील आर्द्रता पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ते कॅमरे गुरुवारी बसविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी श्रीपुजकांनी खोडसाळपणा करीत ते कॅमेरे बंद पाडत त्यावर कापड गुंडाळले.

ही बाब रात्री देवस्थान समिती सदस्यांना समजल्यानंतर शुक्रवारी समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये हक्कदार श्रीपुजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बैठकीला प्रारंभ झाला. यात प्रथम श्रीपुजकांतर्फे माधव मुनीश्वर, बाबूराव ऊर्फ दत्तात्रय ठाणेकर यांनी १९७१ सालापासून गर्भकुटीची किल्ली आमच्याकडे असून, तेथील कॅमेरे सुरू करू नयेत, अशी भूमिका मांडली. यावर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी तुम्हाला कॅमेरे लावण्यास विरोध करता येणार नाही.

संपूर्ण मंदिराची मालकी देवस्थान समितीकडे आहे. तुम्ही किंवा आम्ही त्याचे मालक नाही. त्यामुळे विरोध न करता तेथील कॅमेरे सुरू करून सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्यावर श्रीपुजकांतर्फे माधव मुनीश्वर यांनी तुम्ही आंदोलकांना मदत करता, असा आरोप केला. यावर समिती सदस्य शिवाजी जाधव यांनी आक्षेप घेत ही बैठक कॅमेऱ्यांसाठी असल्याचे सुनावले. त्यानंतरही मुनीश्वर यांनी समिती पैसे खाते असा आरोप केला. यावर आक्रमक होत जाधव यांनी आम्ही पैसे खातो हे सिद्ध झाल्यास राजीनामा देतो, असे सुनावले.

या दरम्यान गोंधळ उडाल्याने कोण काय बोलत आहे हेच समजेना. अखेरीस अध्यक्ष जाधव यांनी हस्तक्षेप करीत कॅमेरे बसविण्यावर समिती ठाम असून, त्यास विरोध केल्यास त्या पुजकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करू व त्या पुजाºयांना चारही दरवाजातून अंबाबाई देवीच्या उंबऱ्यांतसुद्धा प्रवेश देणार नाही.

मंदिराची संपूर्ण मालकी देवस्थानकडे आहे ही बाब विसरू नका, असा सज्जड दम दिला. देवी ही कुणाच्या मालकीची नसून, त्याची व्यवस्था म्हणून देवस्थान समिती नेमली आहे. त्यामुळे याला विरोध करू, नये असे सुनावले. अखेरीस दुपारी १२.५५ वाजता गर्भकुटीतील कॅमेरे सुरू करण्यात आले.

कॅमेऱ्यांना विरोध का?

गर्भकुटीत कॅमेरे बसविण्यास व ते सुरू करण्यास पुजारी मंडळींचा विरोध का हे एका वाक्यात सांगा, असा सवाल अध्यक्ष जाधव यांनी श्रीपुजकांना केला. यावर उपस्थित असलेले माधव मुनीश्वर, बाबूराव ठाणेकर, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, अनिल कुलकर्णी, गजानन मुनीश्वर यांना उत्तर देता आले नाही. केवळ आमच्या हक्कावर गदा येत, असे उत्तर दिले. गर्भकुटीतील उजव्या बाजूस शयनगृह, तर डाव्या बाजूस स्नानगृह आहे. त्या ठिकाणी मोकळी जागा आहे. तेथे सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही सुरू केले जाणार, अशी भूमिका समितीतर्फे जाधव यांनी घेतली. यात पुजकांतर्फे मुख्य आॅनलाईनसाठी एकच कॅमेरा असू दे बाकीचे काढावेत, अशी मागणी वारंवार केली जात होती. मात्र, अखेरपर्यंत कॅमेऱ्यांना का विरोध हे श्रीपुजकांना सांगता आले नाही.

आम्ही मनाने कारभार करीत नाही

माधव मुनीश्वर यांनी तुम्ही आंदोलकांना मदत करता व तुम्ही एकतर्फी निर्णय घेता, असा आरोप केला.त्यावर अध्यक्ष महेश जाधव यांनी ८,९,१० नोव्हेंबरला किरणोत्सव आहे. त्यासह देवीच्या गाभाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आतमध्ये श्रीपुजकांवर नजर ठेवण्यासाठी नव्हे, तर देवीच्या सुरक्षेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवित आहोत, असे प्रथम विनंती व नंतर आक्रमक होत सांगितले. तरीही तुम्ही समितीचे ऐकत नसला तुम्हाला न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे.

विश्वस्त कायद्यानुसार येथील कारभार सुरू आहे. भक्त व आंदोलकांची मागणी होती, त्याला अनुसरून आम्ही हे कॅमेरे बसविले आहेत. त्यात गुरुवारी श्रीपुजकांनी कॅमेरे बंद करून अक्षम्य चूक केली आहे. यातून काही आंदोलन झाले व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी श्रीपुजक मंडळ जबाबदार असेल, असेही सुनावले. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षकांना फोनवरून दिली आहे. त्यामुळे आम्ही मनाने नव्हे, तर सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार कारभार करीत आहोत .

...अखेर कॅमेरे सुरू झाले

गर्भकुटीत बसविण्यात आलेले चार कॅमेरे दुपारी १२.५५ ला देवस्थानचे कर्मचारी राहुल जगताप यांनी सुरू केले. त्यांनी गुरुवारी या कॅमेऱ्यांवर गुंडाळण्यात आलेले कापडही काढून टाकले.

सदस्य-श्रीपुजक खडाजंगी

माधव मुनीश्वर, बाबूराव ठाणेकर, गजानन मुनीश्वर यांनी कॅमेरे बंद करावेत व तेथून काढून टाकावेत ही मागणी जितक्या तीव्रतेने केली होती. तितक्याच आक्रमकपणे कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, संगीता खाडे, शिवाजीराव जाधव यांनी कॅमेरे बसविणारच म्हणून ठणकावून सांगितले. यानंतर माधव मुनीश्वर यांनी समिती पैसे खाते, एजन्सी नेमता असे सांगण्याचा प्रयत्न केला.

यावर आक्रमक होत शिवाजी जाधव यांनी त्यास विरोध केला. तुम्ही पुजारी लोकच पैसे खाता असा पलटवार करीत आम्ही जर पैसे खाल्ल्याचे सिद्ध झाले तर मी आताच्या आता राजीनामा देतो, असे म्हणत आंदोलकांतर्फे उभा राहतो. मग, बघा काय होते ते, असे सुनावले. त्यानंतरही वाद वाढतच गेला. अखेरीस अध्यक्ष जाधव यांनी हस्तक्षेप केला.

पाचजणांनाच प्रवेश

समिती सदस्यांपुढे म्हणणे मांडण्यास श्रीपुजकांनी सर्वांना बैठकीत घ्यावे, अशी भूमिका मांडली. त्यावरही समिती अध्यक्ष जाधव यांनी केवळ पाचजणांनाच प्रवेश दिला जाईल. त्यात दुसरा कोणी आल्यास सर्वांना बाहेर काढू, असा इशारा दिला.

श्रीपुजक हटाव समितीची आक्रमक ‘एन्ट्री’

दरम्यान, श्रीपुजक देवस्थान समितीवर दबाव टाकत आहे, असे समजल्यानंतर दुपारी १२:३० च्या सुमारास श्रीपुजक हटाव समितीचे संजय पवार, विजय देवणे, आर. के. पोवार, कमलाकर जगदाळे, दिलीप पाटील, आनंद माने, नगरसेवक जयंत पाटील, मुरलीधर जाधव, वसंत मुळीक, इंद्रजित सावंत, आदींसह शंभरहून कार्यकर्ते शिवाजी पेठेतील देवस्थान समितीच्या कार्यालयात दाखल झाले.

आक्रमक एन्ट्रीमुळे श्रीपुजकांबरोबरची बैठक आटोपती घेण्यात आली. श्रीपुजक बाबूराव ठाणेकर, माधव मुनीश्वर, गजानन मुनीश्वर, केदार मुनीश्वर, अनिल कुलकर्णी यांना मागील बाजूनी अध्यक्ष जाधव यांनी पोलिसांच्या गराड्यात बाहेर काढले. यावेळी आंदोलकांना सचिवांच्या खोलीत बोलावले त्या खोलीस स्वत: जाधव यांनी कडी लावली. अन्यथा आक्रमक झालेल्या आंदोलकांकडून काहीही घडू शकले असते, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

रस्त्यावर उतरू हिसका दाखवू

अंबाबाई मंदिर प्रश्नी आम्ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे संयम बाळगला आहे. देवस्थान समितीने योग्य निर्णय घेत गर्भकुटीतही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यास श्रीपुजकांनी विरोध करू नये, अथवा दबाव टाकण्याचा किंवा दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नये. नाही तर त्यास रस्त्यावर उतरून हिसका दाखवू, असा इशारा श्रीपुजक हटाव समितीचे दिलीप पाटील यांनी दिला.

सातबारा, गॅझेट, पीटीआरवर देवस्थान समितीचे नाव

अंबाबाई मंदिरासह अन्य जमीन जुमल्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा मालकी हक्क आहे. त्याचे सातबारा उतारे, प्रॉपर्टी कार्ड, गॅझेट, आदींची कागदपत्रे त्यांनी या बैठकीत सादर केली. त्यामुळे पुजकांनी देवीची मालकी आपल्याकडे आहे, असे समजू नये असा इशाराही दिली. केवळ देवस्थानचे व्यवस्थापन करण्यास आम्हा मंडळींची नियुक्ती केली आहे. त्याप्रमाणे आम्ही ती करीत आहोत.

मुख्य दरवाजाची किल्ली आमच्याकडेच

माधव मुनीश्वर, बाबूराव ठाणेकर यांनी गर्भकुटीच्या दरवाजाची किल्ली १९७१ पासून श्रीपुजकांकडे आहे. त्यामुळे तेथे आमचा हक्क व अधिकार आहे, असे सांगितले. यावर समिती अध्यक्ष जाधव यांनी पुढील पितळी दरवाजा ते मंदिरात प्रवेश करणारे चारही दरवाजे आमच्याच ताब्यात व त्याच्या किल्ल्याही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे तेथूनच प्रवेश बंद केला तर तुम्ही पुजक लोक आत कुठे येणार, असा प्रतिसवाल केला. त्यावर श्रीपुजक गप्प झाले.

 

Web Title: Opposing priests to install CCTV in Ambabai pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.