व्यापारी-उद्योजकांंची महापालिकेसमोर निदर्शने, सकारात्मक निर्णयाचे महापौरांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 08:44 PM2019-02-18T20:44:03+5:302019-02-18T20:46:17+5:30
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात भाडेकरू असलेल्या वाणिज्य इमारतीबाबतीत मिळकत कराचे प्रमाण वार्षिक भाड्याच्या ७० टक्के आहे, ते ‘ड’वर्ग महापालिकेच्या तुलनेत सातपट आहे, हा जाचक कर कमी करून तो २५ टक्क्यांपर्यंत आणावा, या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली व्यापारी-उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांनी सोमवारी दुपारी महापालिकेसमोर निदर्शने केली. यावेळी महापौर सरिता मोरे यांनी, कर आकारणीतील चूक मान्य करत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आंदोलकांना दिले.
कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात भाडेकरू असलेल्या वाणिज्य इमारतीबाबतीत मिळकत कराचे प्रमाण वार्षिक भाड्याच्या ७० टक्के आहे, ते ‘ड’वर्ग महापालिकेच्या तुलनेत सातपट आहे, हा जाचक कर कमी करून तो २५ टक्क्यांपर्यंत आणावा, या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली व्यापारी-उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांनी सोमवारी दुपारी महापालिकेसमोर निदर्शने केली. यावेळी महापौर सरिता मोरे यांनी, कर आकारणीतील चूक मान्य करत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आंदोलकांना दिले.
महापालिकेच्यावतीने वाणिज्य इमारत मिळकत कराचा दर हा जास्त आहे, त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या, आय.टी. कंपन्या यायला तयार नाहीत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. शासनाने मालमत्ता करात सुसूत्रता आणण्यासाठी करपात्र मूल्यावर मालमत्ता कर आकारण्याऐवजी मालमत्तेच्या भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारण्यासंबंधी महापालिकेने एप्रिल २०१० मध्ये निर्णय घेतला.
यामुळे व्यावसायिक भाड्याच्या मिळकतींना मात्र भांडवली मूल्याऐवजी भाडेतत्त्वावर आधारित कर आकारणी विनियमातील सूत्रानुसार चालूच राहिली आहे. त्यामुळे वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा कर कित्येक पटीने वाढला आहे. तो ७० टक्क्यांवरून किमान २५ टक्क्यांपर्यंत आणावा, अशी मागणी विविध संघटनांनी करत महापालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली.
महापौर सरिता मोरे यांनी आंदोलकांसमोर जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी, सर्वांना विश्वासात घेऊन वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा कर कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, आदी उपस्थित होते.
या आंदोलनात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव, असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह ललित गांधी, आनंद माने, राजीव परीख, अभिजित मगदूम, शिवाजीराव पोवार, प्रकाश देवलापूरकर, धनंजय दुग्गे, संपत पाटील, जयंत गोयाणी, राहुल नष्टे, अजित कोठारी, आदींचा सहभाग होता.
आंदोलनात सहभागी संघटना
कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज, क्रिडाई कोल्हापूर, असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अॅड इंजिनिअरिंग, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कोल्हापूर क्लॉथ मर्चंट असोसिएशन, इलेक्ट्रीक मर्चंटस् असोसिएशन, हॉटेल मालक संघ, किराणा भुसारी असोसिएशन, आदी सहभागी होते.