आवाडेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:27 AM2017-08-24T00:27:58+5:302017-08-24T00:27:58+5:30

Opposition to the Opposition BJP workers protest | आवाडेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

आवाडेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर भाजप कार्यालयात बुधवारी झालेल्या कार्यकारिणी व नगरसेवक यांच्या बैठकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला जोरदार विरोध केला. जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी, आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला वरिष्ठांनी पूर्णविराम दिल्याची माहिती पक्षश्रेष्ठींनी दिली असल्याचे या बैठकीत सांगितले.
पक्ष विस्तार आणि ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुका या विषयावर येथील भाजपच्या शहर कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष शेळके, नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी, नगरपालिकेचे भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शहर अध्यक्ष शहाजी भोसले, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष वैशाली नायकवडे, नगरसेवक-नगरसेविका, तसेच शहर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीची माहिती भाजप शहर अध्यक्ष शहाजी भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आवाडेंच्या भाजप प्रवेशाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे बुधवारी शहरात हाच विषय उलट-सुलट चर्चेचा झाला होता. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच असल्यामुळे ग्रामीण परिसरातून सुद्धा हीच चर्चा रंगली होती. तर सोशल मीडियावरून प्रवेशाबाबतच्या अनेक प्रकारच्या पोस्ट टाकल्या जात होत्या. तर अनेक प्रकारच्या अफवांनाही उधाण आले होते.
नगरसेवक, कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्ते संतप्त
बैठक सुरू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाचा प्रश्न उपस्थित केला. तसेच काहींनी संतप्तपणे आवाडेंच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला पाहिजे. तसेच कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रवेश रोखून धरला पाहिजे, असे सांगितले. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाध्यक्ष शेळके यांनी, आवाडेंच्या प्रवेशाबाबत आपण वरिष्ठांशी दूरध्वनीवरून बोललो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत यापूर्वीच पोहोचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आवाडेंच्या पक्ष प्रवेशाला पूर्णविराम दिला असल्याचेही स्पष्ट केले.

Web Title: Opposition to the Opposition BJP workers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.