घरफाळ्यांसह इतर करांचे दरही ‘जैसे थे’, स्थायी समिती सभापतींची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:58 PM2019-02-09T13:58:05+5:302019-02-09T13:59:27+5:30
कोल्हापूर शहरातील मिळकतीच्या घरफाळ्यासह कोणत्याही कराच्या आकारणीत वाढ होणार नाही. २०१८-१९ मधील आकारणीप्रमाणेच २०१९-२० मध्येही घरफाळा आकारणी करण्याचा प्रस्ताव तसेच गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला होता, तोच प्रस्ताव आहे तसा चर्चेसाठी मंगळवारी (दि. १२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील मिळकतीच्या घरफाळ्यासह कोणत्याही कराच्या आकारणीत वाढ होणार नाही. २०१८-१९ मधील आकारणीप्रमाणेच २०१९-२० मध्येही घरफाळा आकारणी करण्याचा प्रस्ताव तसेच गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला होता, तोच प्रस्ताव आहे तसा चर्चेसाठी मंगळवारी (दि. १२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इतर करांमध्येही कोणतीही वाढ न करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे सर्वसाधारण सभेतही हा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात येणार आहे. स्थायी सभेनंतर सभापती शारंगधर देशमुख यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
सभापती देशमुख म्हणाले, शहरामध्ये सेवा व सुविधा देण्यासाठी विविध माध्यमांतून कर घेण्याची पद्धती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घरफाळा पद्धती असून २०११ मध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा पद्धती आकारणीला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतींच्या घरफाळ्यामध्ये भरमसाट वाढ झालेली आहे. व्यावसायिक इमारतींच्या आणि भाड्याने दिलेल्या मिळकतींच्या घरफाळ्याची चुकीच्या पद्धतीने आकारणी झाल्यामुळे शहरवासीयांतून संतापाची लाट उसळत आहे.
शुक्रवारी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेसमोर घरफाळा आकारणी २०१८-१९ च्या आकारणीनुसार करण्याचा प्रस्ताव सादर आला होता. प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तो मंगळवारच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा निर्णय झाला. सर्वसाधारण सभेतही या विषयावर चर्चा होऊन कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, पण तो उपसूचनेसह मंजूर करण्यात येणार असल्याचे सभापती शारंगधर देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, चुकीच्या सूत्रानुसार आकारणी केलेल्या वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा घरफाळा भरमसाट वाढल्याने तो २५ टक्क्यांपर्यंत कमी करावा, अशी मागणी क्रिडाई संघटनेच्या वतीने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली होती. त्यावरही सभेत चर्चा होणार आहे.
पाणीपुरवठा, इस्टेट, परवाना करातही वाढ नाही
घरफाळ्यासह पाणीपुरवठा, इस्टेट, परवाना, नगररचना, अग्निशमन दल आदींच्या वतीने आकारणी करण्यात येणाºया करातही कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. त्याबाबतचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार असल्याचेही सभापती देशमुख यांनी सांगितले.