अन्यथा अजित पवारांच्या कार्यालयासमाेर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:24 AM2021-09-25T04:24:21+5:302021-09-25T04:24:21+5:30
कोल्हापूर : बहुतांशी ग्रामपंचायतींनी अजूनही किमान वेतनाचा हिस्सा आणि राहणीमान भत्ता दिलेला नाही. शासन निर्णय होऊनही त्याची शंभर ...
कोल्हापूर : बहुतांशी ग्रामपंचायतींनी अजूनही किमान वेतनाचा हिस्सा आणि राहणीमान भत्ता दिलेला नाही. शासन निर्णय होऊनही त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही. जर ही मागणी मान्य झाली नाही तर अर्थमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाच्यावतीने देण्यात आला.
आयटक संलग्न या संघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. टाऊन हाॅलमधून या मोर्चाला सुरुवात झाली. ‘या सरकारचे करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. प्रत्येक तालुक्याचा फलक लावून बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले.
नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे शिवाजी पाटील, सम्राट मोरे, रवी कांबळे, बबन पाटील, मदन निकम, दिनेश चौगले, पांडुरंग दळवी, भिकाजी कुंभार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या सर्वांनी यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्याशी मागणीनिहाय चर्चा केली.
चौकट
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
१ २८ एप्रिल २०२० ज्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतीची उत्पन्नाची अट कायम ठेवल्याने १०० टक्के वेतन मिळण्यास अडथळा.
२ किमान वेतनाचा उर्वरित हप्ता आणि राहणीमान भत्ता मिळावा
३. अनेक ग्रामपंचायतींनी भविष्य निर्वाह निधीच्या रकमा भरलेल्या नाहीत.
४. सेवा पुस्तके पूर्ण भरलेली नाहीत.
५. कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही.
६ .कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालेले नाही.
चौकट
मग अंमलबजावणी का होत नाही
यातील अनेक मुद्द्यांबाबत जिल्हा परिषदेने वारंवार ग्रामपंचायतींना कळविले असल्याचे अरुण जाधव यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना सांगितले. मग तुमच्या आदेशांची अंमलबजावणी का होत नाही असा सवाल नामदेव गावडे यांनी उपस्थित केला. तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक परिपत्रक तातडीने काढण्यात येईल. याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल असे आश्वासन जाधव यांनी दिले.
२४०९२०२१ कोल ग्रामपंचायत मोर्चा
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाच्यावतीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. (आदित्य वेल्हाळ)