अन्यथा ‘गोकुळ’च्या ७/१२ वर महाडिकांचे नाव लागेल : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:24 AM2021-05-01T04:24:00+5:302021-05-01T04:24:00+5:30

कोल्हापूर : महाडिकांनी ‘गोकुळ’मधील आपले ४० टँकर, दूध वितरणाचा ठेका, कार्यक्षेत्राबाहेरील दूध या व अन्य माध्यमांतून कोट्यवधी रुपयांची माया ...

Otherwise, Mahadik's name will appear on 7/12 of 'Gokul': Satej Patil | अन्यथा ‘गोकुळ’च्या ७/१२ वर महाडिकांचे नाव लागेल : सतेज पाटील

अन्यथा ‘गोकुळ’च्या ७/१२ वर महाडिकांचे नाव लागेल : सतेज पाटील

Next

कोल्हापूर : महाडिकांनी ‘गोकुळ’मधील आपले ४० टँकर, दूध वितरणाचा ठेका, कार्यक्षेत्राबाहेरील दूध या व अन्य माध्यमांतून कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे. दूध उत्पादकांचे काहीही झाले तरी चालेल, पण स्वत:चा व्यवसाय शाबूत राहिला पाहिजे यासाठीच त्यांचा सगळा खटाटोप सुरू आहे. जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादक सभासदांनी या निवडणुकीत महाडिकांचा हा कुटिल डाव उधळून लावावा, अन्यथा गोकुळच्या ७/१२ वर महाडिकांचे नाव लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

‘गोकुळ’चे ठरावधारक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, महाडिकांनी ठेकेदार म्हणून ‘गोकुळ’मध्ये प्रवेश करून संघ स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. त्यांना ‘गोकुळ’च्या ५ लाख दूध उत्पादकांशी काहीही देणेघेणे नाही. स्वत:च्या व्यवसायासाठीच त्यांना गोकुळची सत्ता हवी आहे. त्यांच्या ४० टँकरच्या बिलापोटी दर १५ दिवसाला ८० लाख म्हणजेच वर्षाला किमान २० कोटी रुपये मिळतात. गेल्या २० वर्षांत त्यांनी गोकुळमध्ये भोगलेल्या सत्तेचा विचार केल्यास बिलाची रक्कम ४०० कोटी रुपयेपर्यंत जाते. यामुळेच महाडिकांचा जीव गोकुळमध्ये अडकलेला आहे.

पुण्यातील दूध पॅकिंगचा ठेका गेली २० वर्षे महाडिकांच्या जावयाकडे आहे. यातून त्यांना महिन्याला १ कोटीहून अधिक रक्कम मिळते. गोकुळच्या कार्यक्षेत्राबाहेरील दूध कमी दरात आणून ते इतर माध्यमातून संघाला विकणे आणि त्यातून स्वत:चा फायदा करून घेणे अशी त्यांची कामाची पद्धत आहे.

गोकुळ कायमस्वरूपी आपल्या ताब्यात राहावा यासाठीच महाडिकांनी गोकुळला मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न केला, पण दूध उत्पादक सभासदांच्या पाठबळावर संघर्ष करून आम्ही हा प्रयत्न हाणून पाडला. महाडिकांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी गोकुळच्या निवडणुकीत परिवर्तन घडवा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

महाडिकांच्या टँकरना मात्र पाच दिवसांत बिल

दहा दिवसाला दुधाची बिले दिल्याचा गाजावाजा सत्तारूढ गट करत आहे. मात्र, महाडिकांच्या ४० टँकरना संघात ‘थ्रू’ पास दिला जाऊन त्यांच्या टँकरची बिले पाच दिवसांत दिली जातात. उत्पादकांना दहा दिवसाला. मात्र, वाहतुकीचे पाच दिवसांनी बिल असा अजब कारभार ‘गोकुळ’मध्ये सुरू असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

‘अमल’, ‘स्वरूप’ हेच का सामान्य कार्यकर्ते

‘गोकुळ’मध्ये महाडिकांच्या संस्थेमार्फत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे टँकर लावल्याचे माजी खासदार सांगत आहेत. प्रत्यक्षात हे टँकर अमल महाडिक, स्वरुप महाडिक, व्यंकटेश्वर गुड्स, कोल्हापूर आईस फॅक्टरी, तसेच महाडिकांचे मॅनेजर राजन हिंदुराव शिंदे यांच्या नावावर आहेत. याबाबतची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. हेच महाडिकांचे सर्वसामान्य व गोरगरीब कार्यकर्ते आहेत का? असा सवाल मंत्री पाटील यांनी केला.

कोल्हापूर आईस फॅक्टरी महाडिकांचीच

गोकुळमध्ये कोल्हापूर आईस फॅक्टरीच्या नावावर टँकर असून ही कोल्हापूर आईस फॅक्टरी कोणाची ? असा प्रश्न गेली कित्येक वर्षे आम्ही विचारत आहोत. याचा आम्ही शोध घेतला असून ही आईस फॅक्टरी स्वरुप महाडिक आणि महाडिकांचे मॅनेजर राजन शिंदे यांच्या नावावर असल्याचा गौप्यस्फोट मंत्री पाटील यांनी केला.

फोटो ओळी : ‘गोकुळ’ ठरावधारकांच्या बैठकीत शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. (फाेटो-३००४२०२१-कोल-सतेज पाटील)

Web Title: Otherwise, Mahadik's name will appear on 7/12 of 'Gokul': Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.