Kolhapur Crime: पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून पोवाचीवाडीत पोलिस पाटलाचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:27 PM2023-06-26T12:27:21+5:302023-06-26T12:28:34+5:30
पोलिस संघटना व कुटुंबीयांच्या संतापामुळे गावात काही काळ तणाव
चंदगड : पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून चौघांनी कोयता, खुरप्याने केलेल्या हल्ल्यात पोवाचीवाडी येथील तरुण पोलिस पाटलाचा जागीच मृत्यू झाला. संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४१) असे मृताचे नाव असून, देवाचीरांगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला होता. पोलिस संघटना व कुटुंबीयांच्या संतापामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण झाले आहे, त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप यांना बोलावून घेतले. संदीप पाटील हे गुरव यांच्या देवाचारांगी नावाच्या शेतात संशयित रोहित पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरुण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले असता जुन्या वादात पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी कोयता व खुरप्याने हातावर, डोक्यात व मानेवर सपासप वार केले. संदीप यांना नेसरी येथील रुग्णालयात नेण्यात आले; पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित मुख्य आरोपींपैकी रोहित स्वतःच शनिवारी रात्रीच पोलिसांना शरण आला. इतर तिघांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. संदीप पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रविवारी शवविच्छेदनानंतर संदीपच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तक्रारीत नाव घातल्याचा राग
संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) या नातलगात मार्च २०२३ रोजी भांडण झाले होते. यामध्ये रोहित व भावकीतील काहीजणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये संदीप यांनीच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याच्या रागातून हा खून झाल्याची फिर्याद वडील ज्ञानदेव पाटील यांनी पोलिसांत दिली आहे.
फोन करणाऱ्याला अटक करा
या प्रकरणात संदीप यांना फोन करून सुरेश गुरव यांनी बोलवून घेतले असून, तेही या खुनात सामील असल्याने त्यांनाही अटक करा, मगच मृतदेह ताब्यात घेणार, अशी भूमिका पत्नी अनुराधा व पोलिस संघटनेने घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भाजपचे शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर यांनी कुटुंबीयांची समजूत काढली. तसेच पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी गुरव यालाही अटक करू, असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.