पोलीस भरतीसाठी चार दिवसांत १६ हजारांवर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:38+5:302021-08-12T04:29:38+5:30
कोल्हापूर : तीन वर्षे रखडलेली पोलीस भरती राज्यभर होत आहे, त्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ...
कोल्हापूर : तीन वर्षे रखडलेली पोलीस भरती राज्यभर होत आहे, त्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत सुमारे १६ हजार २०६ जणांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यासाठी ७८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
राज्यात दरवर्षी सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात, पण गेली तीन वर्षे भरती रखडल्याने पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे झाली आहेत. कोरोना संसर्ग आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे भरती रखडली आहे. २०१९ मध्ये जाहीर झालेल्या पोलीस भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. एसईबीसी हे आरक्षण रद्द केल्यामुळे त्यावेळी अर्ज केलेल्यांनी पुन्हा आर्थिकदृष्ट्या मागासमधून (ईडब्ल्यूएस) अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. आतापर्यंत सुमारे १६ हजार २०६ जणांनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. पोलीस भरतीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी ती भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रतीक्षा लागून राहिलेल्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी भरतीवेळी प्रथम शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती, पण यंदाच्या भरती प्रक्रियेवेळी प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतरच शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर भरती प्रक्रिया सुरू झाल्याने भरतीसाठी अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. पात्र अर्जदारासाठी १२ उत्तीर्णचे प्रमाणपत्र, एमएससीआयटी हा संगणक कोर्स उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र, तसेच जात प्रमाणपत्र अशी कागदपत्रे भरतीसाठी आवश्यक आहेत. हे अर्ज भरण्यासाठी ई-महा सेवा केंद्रावर गर्दी दिसत आहे.