कागलमधील १४ झोपडपट्ट्यांना सहा महिन्यांत मालकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 10:14 AM2020-10-24T10:14:16+5:302020-10-24T10:16:19+5:30
kagal, hasan musrif, kolhapurnews, muncipalty कागल नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या १४ झोपडपट्टी वसाहतींना येत्या सहा महिन्यांत मालकी हक्क मिळेल असे नियोजन करा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल यंत्रणेला दिल्या. शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली.
कोल्हापूर : कागल नगरपरिषदेच्या हद्दीत असणाऱ्या १४ झोपडपट्टी वसाहतींना येत्या सहा महिन्यांत मालकी हक्क मिळेल असे नियोजन करा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल यंत्रणेला दिल्या. शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली.
या झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्यासाठी सर्व्हेक्षण करून मोजणी करावी. ज्यांची मोजणी झालेली आहे त्यांचे प्रस्ताव नगररचना कार्यालयाकडे पाठवावेत. भूमी अभिलेख कार्यालयाने तत्काळ मोजणी करून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावेत, अशी सूचना मुश्रीफ यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी गोरगरिबांसाठी तळमळीने वेळेत काम पूर्ण करावे. येत्या सहा महिन्यांत या झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करून त्यांचा मालकी हक्क त्यांना प्रदान करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. वसंत निकम, कनिष्ठ अभियंता सुनील माळी, महसूलच्या तहसिलदार रंजना बिचकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक नितीन दिंडे, आनंदराव पसारे, सतीश घाटगे उपस्थित होते.
या आहेत १४ झोपडपट्टी वसाहती
कागल नगरपरिषदेच्या हद्दीत वड्डवाडी गोसावी वसाहत, कुरणे झोपडपट्टी / जगताप वसाहत, पसारेवाडी / बिरदेव वसाहत, बिरदेव वसाहत, मडीगेट कॉर्नर, राजीव गांधी वसाहत, सांगाव नाका फुले वसाहत, मातंग वसाहत, दावणे गल्ली पिंजारी पर्डी, बेघर वसाहत, पसारेवाडी, मठुरेपर्डी, आंबेडकर वसाहत, वड्डवाडी गोसावी वसाहत अशा १४ झोपडपट्ट्या आहेत.