जिल्ह्यात १४ ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:26 AM2021-05-07T04:26:34+5:302021-05-07T04:26:34+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आले तर त्याची पूर्वतयारी म्हणून ‘मिशन ऑक्सिजन’ अंतर्गत जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सिजन ...
कोल्हापूर : जिल्ह्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आले तर त्याची पूर्वतयारी म्हणून ‘मिशन ऑक्सिजन’ अंतर्गत जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यापैकी जिल्हा नियोजनमधून सात प्रकल्पांसाठीचे काम सुरू असून, राज्य शासनाकडे सहा प्रकल्पांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. यामुळे रोज २३ टन ऑक्सिजनची निर्मिती होऊन १२०० रुग्णांची सोय होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी दिली.
सध्या जिल्हा नियोजनमधून सी.पी.आर, आयसोलेशन रुग्णालय, आय.जी.एम, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, ग्रामीण रुगणालय गारगोटी, मलकापूर, राधागनरी येथे ऑक्सिजन निर्मिती, तर उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे ऑक्सिजन बुस्टर प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय शिरोळ, चंदगड, आजरा, कागल आणि गगनबावडा येथील पी.एस.ए. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यांची साठवणूक क्षमता ५०० एलपीएम इतकी असणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ८२ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. सध्या जिल्ह्यातून सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, निपाणी, बेळगाव भागात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
--
ऑक्सिजनची दैनंदिन सद्य:स्थिती
जिल्ह्यातून ५०.९३ टन ऑक्सिजनची मागणी
सध्या ३५ टन ऑक्सिजनचा पुरवठा
जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची वाढ लक्षात घेता ६३.६६ टन इतक्या ऑक्सिजनची गरज.
ऑक्सिजन क्षमता सद्य:स्थिती
रुग्णालयाचे नाव : साठवणूक क्षमता
१ सी.पी.आर. : २० केएल लिक्विड टँक
२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, : ६ केएल लिक्विड टँक
३ उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज : पीएसए. प्रकल्प ७२९ एलपीएम ऑक्सीजन निर्मिती
४ इंदिरा गांधी रुग्णालय, इचलकरंजी : ६ केएल लिक्विड टँक
५ संजय घोडावत, कोविड काळजी केंद्र अतिग्रे : ६ केएल लिक्वीड टँक
जिल्ह्यातील १३६ कोविड हॉस्पिटल व सेंटर्समार्फत ऑक्सिजनची व्यवस्था आहे.
----
१२०० रुग्णांची गरज भागणार
प्रस्तावित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून प्रतिदिवस १८०० इतके सिलिंडर भरण्याची क्षमता निर्माण होणार आहे. त्यातून १ हजार २०० रुग्णांची गरज भागणार आहे. जिल्हा नियोजनमधून उभारण्यात येणाऱ्या आठ प्रकल्पांसाठी ६ कोटी ७६ लाखांचा निधी आवश्यक आहे. राज्यशासनाकडील प्रस्तावित सहा प्रकल्पांसाठी ५ कोटी ६० लाख इतका खर्च अपेक्षित आहे.