‘पी. एन.’ यांचा सल्ला दूध उत्पादकांसह नेत्यांच्याही भल्याचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 04:02 PM2017-12-10T16:02:40+5:302017-12-10T16:04:39+5:30

‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादक संपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही.

'P. N. 'Advice of milk producers and well wishers of leaders | ‘पी. एन.’ यांचा सल्ला दूध उत्पादकांसह नेत्यांच्याही भल्याचा

‘पी. एन.’ यांचा सल्ला दूध उत्पादकांसह नेत्यांच्याही भल्याचा

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादक
संपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पी. एन. पाटील यांनी महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांना दिलेला सबुरीचा सल्ला उत्पादकांबरोबरच नेत्यांच्या भल्याचा असेच म्हणावे लागेल.
कोल्हापूरचे राजकारण साखर कारखान्यांभोवती फिरत असले तरी अर्थकारण मात्र दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. पावणेदोन वर्षांनी मिळणा-या उसाच्या पैशातून अल्पभूधारक शेतक-यांच्या जीवनात कधीच स्थैर्य आले नाही. त्यामुळे या शेतक-यांना जगविण्याबरोबरच त्यांचे संसार उभे करण्याचे काम दूध व्यवसायाने, पर्यायाने ‘गोकुळ’ने केले. कोणतीही संस्था राजकारणविरहित
राहूच शकत नाही. त्यात ‘गोकुळ’च्या दुधाची चव थोडी न्यारीच असल्याने येथे सत्तेत येणाºयांना हे दूध लवकर मानवते. येथील सत्तेचा वापर करून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता येते आणि यासाठीच सध्या महाडिक-पाटील
यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कोणत्याही संस्थेच्या निवडणुकीनंतर विरोधक किमान चार वर्षे तिकडे फिरकत नाहीत. ‘गोकुळ’बाबतही आतापर्यंत तसेच झाले आहे; पण या वेळेला सतेज पाटील यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच आक्रमक भूमिका घेतली. दुस-या सभेला हजर न राहताच सत्तारूढ गटाच्या अहंपणाने सभा जिंकली. सभा बेकायदेशीरची प्रक्रिया सुरू
असतानाच गाय दूध खरेदी दरातील कपातीचा मुद्दा घेऊन त्यांनी गेले महिनाभर रान उठविले. उत्पादकांच्या दृष्टीने ही भूमिका न्याय्य असल्याने पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत झाले; पण या मागणीच्या आडून त्यांनी राजकीय उट्टे काढण्यास सुरुवात केल्याने उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था पसरली.
महाडिक-पाटील यांच्यातील वाद कशासाठी, हे जिल्ह्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गोकुळ’चे नेतृत्व महाडिक यांच्याबरोबरच पी. एन. पाटील करतात. पण सतेज पाटील यांच्या टीकेचा रोख महाडिक यांच्यावरच राहिल्याने त्यांचा उद्देश लपून राहिलेला नाही.  राजकीय वैरत्वासाठी वेगळी मैदाने आहेत, त्या ठिकाणी ही भूमिका  कदाचित योग्यही असेल; पण सर्वसामान्य माणसांचा संसार
ज्या संस्थेवर उभा आहे, तिचा वापर करून एकमेकांचे उट्टे काढण्याचा हा प्रकार म्हणजे ‘घर जाळून कोळशाचा व्यापार करणे’ असाच म्हणावा लागेल.
दोन्ही नेत्यांतील वादावर शांत बसलेल्या पी. एन. पाटील यांनी मोर्चात मनातील खदखद बोलून दाखवीत ‘स्वत:च्या राजकारणासाठी ‘गोकुळ’चा वापर करू नका,’ असा सबुरीचा सल्लाही दिला. या सल्ल्यानंतर महाडिक व पाटील यांना किमान ‘गोकुळ’बाबत तरी संयमाने वागावेच लागेल. पी. एन. पाटील यांचा सबुरीचा सल्ला उत्पादकांसह दोन्ही नेत्यांच्या भल्याचा आहे. दोघांच्या भांडणात सामान्यांच्या अर्थवाहिनीला धक्का लागला तर उत्पादक उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.
‘पी. एन.’ यांची सावध भूमिका-
पी. एन. पाटील यांची १९९५ पासूनची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या पाचपैकी चार विधानसभा निवडणुकीतील पराभव पक्षांतर्गत राजकारणामुळेच झाला आहे. ज्यांच्यासाठी विरोधकांसह स्वपक्षियांना अंगावर घेतले तेही ऐन वेळी आपले रंग दाखवीत असल्याने त्यांनी आता थोडी सावध भूमिका घेणेच पसंत केल्याची चर्चा आहे.

संचालकांच्या सवयी बदलणे गरजेचे
 ‘गोकुळ’चे संचालकपद मानाचे आहेच; त्याबरोबर तेथील बडदास्तीमुळे ते अधिक चर्चेत राहिले. आमदारकी नको; पण संचालकपद द्या, अशी चर्चा होण्यामागे हेच कारण आहे. येथून पाठीमागे दूध उत्पादकांमध्ये जागृती नव्हती, त्यावेळेला कसेही वागले तरी कोणी विचारीत नव्हते. आता बहुतांश दूध उत्पादक हे तरुण व सुशिक्षित असल्याने दहा दिवसांचा हिशेब मांडला जातो. त्यामुळे पूर्वीच्या
सवयींमध्ये संचालकांनी बदल करणे गरजेचे आहे; अन्यथा संघर्ष अटळ आहे.

Web Title: 'P. N. 'Advice of milk producers and well wishers of leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.