कोल्हापूर : गोकूळच्या प्रमुख सत्तारूढ संचालकांनी मंगळवारी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी गॅरेजवर भेट घेऊन गोकूळच्या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा केली. मात्र यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील उपस्थित नव्हते. त्यांची आणि पी. एन यांची सोमवारी रात्री भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र याला दुजोरा मिळालेला नाही.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज, गुरुवारी सकाळी १० वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व तालुकाध्यक्षांची बैठक मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी बोलवली आहे. या सर्वांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे. सर्वांनी ताकदीने गोकूळ आणि राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासमवेत राहण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
गोकूळच्या संचालक मंडळाची मंगळवारी मासिक बैठक होती. यानंतर काही प्रमुख संचालक आमदार पाटील यांना भेटले. यावेळी गोकूळबाबत प्राथमिक चर्चा झाली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी गोकूळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांची मंगळवारी भेट घेतली. दोघेही ३४ वर्षे एकत्र गोकूळमध्ये कार्यरत असल्याने या दोघांमध्ये याच विषयावर चर्चा झाल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर आमदार राजेश पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील यांची भूमिका ठरणार आहे. मात्र सहकारामध्ये पक्षीय राजकारण नको अशी भूमिका सुरुवातीपासून आमदार पाटील यांनी घेतली होती. परंतु मुश्रीफ यांनी ठोस भूमिका घेतल्यानंतर राजेश पाटील यांनाही त्यांच्यासमवेत जावे लागेल. परंतु तसे झाल्यास त्यांना विरोध करणाऱ्या गोपाळराव पाटील आणि कुपेकर बंधूंच्या समवेतच्या आघाडीत जावे लागणार आहे, ही त्यांच्यासाठी अडचण आहे.