‘के. पी.’ हटावसाठी कायपण
By admin | Published: October 2, 2014 12:35 AM2014-10-02T00:35:44+5:302014-10-02T00:37:39+5:30
कॉँग्रेसची निवडणुकीतून माघार : विरोधक एकवटले
संजय पारकर- राधानगरी कॉँग्रेसच्या नेत्यांनी तलवारी म्यान केल्यामुळे निवडणुकीतील लढतीचे चित्रच बदलले आहे. बहुरंगी लढत अपेक्षित असताना आता तिरंगी होणार आहे. यामुळे प्रचंड चुरशीने निवडणूक होणार आहे. आमदार के. पी. पाटील यांना सोपी वाटणारी निवडणूक काहीशी खडतर होणार आहे. या निवडणुकीत ‘के.पी. हटाव’साठी कायपण करण्यावर विरोधकांचा भर राहील, असे दिसते.
विस्तार व मतदार संख्येने मोठा असलेल्या या मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत विरोधकांतील दुहीमुळे के. पी. पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले. तिन्ही तालुक्यांत असलेली राष्ट्रवादी कॉँग्रेसची मजबूत फळी, बहुतांश प्रमुख सत्तास्थाने, नियमित संपर्क व विकासकामांचा दावा या जिवावर विजयाची हॅट्ट्रिक करायची, असा चंग बाधून त्यांनी दोन महिन्यांपासून प्रचारही सुरू केला आहे.
राज्यातील सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली नसती, तरीही येथे मात्र संपूर्ण कॉँग्रेस त्यांच्या विरोधातच राहिली असती. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्या राजकीय त्रासाने गांजलेल्या कॉँग्रेसच्या राधानगरीतील नेत्यांनी एकजूट करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, पक्षाची उमेदवारी मिळविण्यात भुदरगडमधील माजी आमदार बजरंग देसाई यशस्वी ठरले. त्यामुळे असंतोषात पुन्हा भर पडली. त्यांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यासाठी दोन दिवस खलबते सुरू होती. तसा निर्णयही झाला. त्यामुळे एकाकी पडण्याऐवजी निवडणुकीत माघारीचा निर्णय देसाई यांनी घेतला.
गतवेळी अपक्ष म्हणून लढून लक्ष्यवेधी मते घेतलेल्या प्रकाश आबिटकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून शिवसेनेत सक्रिय होऊन या पक्षाची उमेदवारी मिळविली. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मिळालेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ते लढतीत प्रमुख उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले होते. कॉँग्रेसचा उमेदवारच रिंगणात नसणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तशी चर्चा झाल्याचेही बोलले जाते.
सेना-भाजपची युती तुटल्याने हे दोन पक्ष वेगळे झाले. तशी भाजपची ताकद येथे नाहीच आहे. मात्र, ’स्वाभिमानी’, आरपीआय (आठवले गट) यांच्या युतीतून ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालंदर पाटील रिंगणात आहेत. केंद्रातील सत्ता, खा. राजू शेट्टी यांचा करिष्मा व शेतकऱ्यांचे संघटन याचा त्यांना फायदा होणार असल्याने लढतीत तेही राहणार आहेत. याशिवाय तांबाळे येथील महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे साताप्पा कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक सुतार, अपक्ष अशोक भाऊसो खोत, उमेश गणपती पाटील हे ही रिंगणात आहेत; पण खरी लढत के. पी. पाटील, प्रकाश आबिटकर व प्रा. जालंदर पाटील यांच्यातच होणार आहे. राधानगरी तालुक्यातील कॉँग्रेसमध्ये के.पी. हटावसाठी कायपण, अशी भूमिका होती. त्यामुळे शिवसेनेचे असूनही आबिटकर यांना त्यांचे पाठबळ मिळू शकते. भुदरगडमधील दिनकरराव जाधव यांनी मागीलवेळी त्यांना पाठबळ दिले होते. आगामी ‘बिद्री’ची निवडणूक लक्षात घेता यावेळीही तसे होऊ शकते. मात्र, बजरंग देसाई व आबिटकर हे स्थानिक प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचा निर्णय काय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेसाठी आठ उमेदवार रिंगणात असून कालपासून सुरू असलेल्या चर्चेतून कॉँग्रेसने धक्कादायक निर्णय घेतला. पक्षाचे उमेदवार माजी आमदार बजरंग देसाई यांनी, तसेच हिंदुराव चौगले, अरुण डोंगळे, सत्यजित जाधव यांनीही अर्ज मागे घेतले. त्यांचा पाठिंबा आबिटकर यांना राहण्याची शक्यता असल्याने के. पी. पाटील यांचा चांगलाच कस लागेल.
राधानगरी
एकूण मतदार ३,0६,00५
नावपक्ष
के. पी. पाटील राष्ट्रवादी
प्रकाश आबिटकर शिवसेना
जालंदर पाटील स्वाभिमानी
अशोक सुतार बहुजन मुक्ती पार्टी
साताप्पा कांबळे बसपा
अशोक खोतअपक्ष
उमेश कांबळेअपक्ष
विजयमाला देसाई अपक्ष