पोर्ले तर्फे ठाणे : चार दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पडवळवाडी (ता. करवीर) येथील उभ्या पिकांसह शेती वाहून गेली आहे. जोतिबा डोंगरातून प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या दगड, गोठे आणि मातीमुळे ऊस पीक भुईसपाट झाले. शेतीच्या बांधांना जागोजागी भगदाड पडून शेतीसह पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य पंडित नलवडे यांनी केले आहे.
मुसळधार पावसामुळे पडवळवाडीच्या उत्तरेकडील बाजूस असणाऱ्या शिवारातील लघु बंधाऱ्याचे पाणी आणि जोतिबा डोंगरातून उताऱ्याच्या दिशेने येणारा तीव्र पाण्याचा प्रवाह थेट उभ्या पिकात शिरून वाहत गेल्याने पिके जमीनदोस्त झालीत. नलवडे वसाहतींकडे जाणाऱ्या गुजरणीच्या पाणंदीतील मोहरी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने शिवाराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. दोन वर्षांपूर्वी खचलेल्या जोतिबा रोडच्या दुरूस्तीचे काम करताना बांधकाम विभागाने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जागोजागी मोहऱ्या ठेवल्या आहेत. त्याचं मोहरीचे पाणी प्रवाहाने पडवळवाडीच्या शेतात घुसून प्रत्येक वर्षी शेतीपिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे मोहरी बांधताना पडवळवाडीच्या शेतीचा आणि गावाच्या सुरक्षितेबाबतचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाने करायला पाहिजे होता अशी खंत नलवडे यांनी व्यक्त केली आहे.
पडवळवाडी (ता. करवीर) येथील शिवारात मुसळधार पावसाच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेले दगड उसाच्या शेतात अडकले आहे.