स्मार्टफोनमधील ॲप काढून चीनविरोधातील लढ्यात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:38 AM2020-07-01T10:38:16+5:302020-07-01T10:42:49+5:30
देशाला घातक असणाऱ्या ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तरुणाईकडून स्वागत केले जात आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले चिनी ॲप काढून टाकणे तरुणाईने सुरू केले आहे. या माध्यमातून आपण चीनविरोधातील लढ्यात सहभाग असल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे.
कोल्हापूर : देशाला घातक असणाऱ्या ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तरुणाईकडून स्वागत केले जात आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले चिनी ॲप काढून टाकणे तरुणाईने सुरू केले आहे. या माध्यमातून आपण चीनविरोधातील लढ्यात सहभाग असल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे.
केंद्र सरकारने चीनविरुद्ध पुकारलेल्या या सायबर वॉरबाबत लोकमतने तरुणाईच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या ॲप वापरासाठी व्यतित होणाऱ्या आपल्या मौल्यवान वेळेच्या बदल्यात चीन करोडो रुपये कमवीत होते. पण, आता वेळ आहे खडबडून जागे व्हायची, डोळे उघडून आपल्या देशाच्या भवितव्याची काळजी करायची. भारतीयांचा गोपनीय आणि वैयक्तिक डेटा ह्या ॲपद्वारे चोरला जातो, हे उघड झाले आहे. त्यामुळे बंदीचा निर्णय योग्य आहे.
सरकारने आता इतर चिनी वस्तूंना पर्यायी उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाशी संबंधित दोन माध्यमांमधील वादामुळे जवळपास ६० लाख भारतीयांनी प्ले स्टोअरवर टिक टॉकला सर्वात कमी रँकिंग दिले होते. ही मोहीम बरीच गाजली. त्यामुळे या जनभावनेला पुष्टी देणारा हा निर्णय आहे. हे विविध ॲप काढून टाकल्याने चीन विरुद्ध लढ्यात आपणही सामील आहोत अशी भावना तरुणाईसह सामान्य लोकांमध्ये तयार होऊ लागली आहे.
बहुतांश ॲप डाउनलोडसाठी अजूनही उपलब्ध
ही ॲप बंदी आणल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियाचा धुमाकूळ उडालेला आहे. वेगवेगळे मिम बनवून तरुणाई, नागरिक व्यक्त होत आहेत. मात्र, अजूनही प्ले स्टोअरवर यातील बहुतांश ॲप डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी कधी आणि कशी होणार याबद्दल सामान्य माणसाच्या मनात अजून स्पष्टता नाही. शिवाय ज्यांच्या मोबाईलवर आधीपासून ही ॲप इंस्टाल आहेत त्यांचे काय होणार हे देखील समजणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया सोशल मिडिया अभ्यासक विनायक पाचलग यांनी व्यक्त केली.
सध्या चाललेल्या भारत-चीन संघर्षाच्या दृष्टीने पाहता चिनी ॲप वापरणे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. जगभरात चीनबद्दल नकारात्मकता वाढत असताना तेथून बाहेर पडणाऱ्या कंपनींना भारतात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न सरकारने करावेत.
-अथर्व कुलकर्णी,
विद्यार्थी, कोल्हापूर
आपला देशही तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात कमी नाही हे जगाला आणि चीनला दाखवून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे तरूणाईने चीनचे वेड डोक्यातून आणि स्वतःच्या मोबाईल मधून काढून टाकावे. स्वच्छ आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याकडे एक पाऊल पुढे आत्मविश्वासाने टाकावे.
-रिया बोंद्रे,
विद्यार्थीनी, केआयटी कॉलेज