संदीप बावचे -- शिरोळ --जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांच्या शोधात काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रमुख पक्षांची दमछाक होत असून यातच कार्यकर्त्यांच्या राजी-नाराजींच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता उमेदवारी देण्यासाठी पक्षांच्या नेत्यांकडून इच्छुक उमेदवारांपैकी एकाची निवड करण्यात दमछाक होत असून तिकिट वाटपात पक्षांची परिक्षा सुरु झाली आहे. शिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद व चौदा पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तर पंचायत समितीचे सभापतीपद खुले असल्याने खुल्या गट व गण असलेल्या मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी आहे. नांदणी व दत्तवाड हे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहेत. याठिकाणी सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. आघाड्या कि युती याचे भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे इच्छुकांचीही घालमेल सुरु आहे. पंचायत समितीचे कोथळी, गणेशवाडी, अकिवाट व अब्दुललाट हे गण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असून या मतदारसंघातील उमेदवारांचे महत्व वाढले आहे. या मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार सभापती बनणार हे निश्चित आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी या मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे. असे असलेतरी अद्यापही उमेदवार निश्चित नाहीत. सध्या इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटीवर जोर दिला असलातरी नेत्यांनी उमेदवारांची नांवे गुलदस्त्यात ठेवली आहेत. ऐनवेळी पक्षांकडून उमेदवारी डावलल्यास बंडाच्या भुमिकेत इच्छुक दिसत आहेत. त्यामुळे राजकीय विस्फोट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इच्छुकांची घालमेलतालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी गृहीत धरुन नेत्यांनी जागा वाटपाचे धोरण निश्चित केले आहे. दोन्ही पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. शिवसेना व भाजपाला रोखण्यासाठी नेत्यांनी तुल्यबळ उमेदवार निश्चित केले असलेतरी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदणी व उदगांव येथील उमेदवारांची नांवे जाहीर करुन राजकीय व्युहरचना आखली आहे. युती कि आघाडी नेत्यांच्या या भुमिकेमुळे कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहेत. ग्रामीण नेत्यांना ‘अच्छे दिन’शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांनी गट, गणातील स्थानिक ग्रामीण नेतृत्वाला विश्वासात घेवून आपल्याकडे खेचण्याची तयारी सुरु केली असून सध्यातरी या नेत्यांना ‘अच्छे दिन’ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जागा वाटपावरुन बिघाड्यांचे चित्रतालुक्यात दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असून, राजेंद्र पाटील-यड्रावकर व गणपतराव पाटील यांनी जागा वाटपाचे सूत्र निश्चित केल्याचे समजते. दोन दिवसांपासून स्वाभिमानी व भाजपात युतीवरुन चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. त्यातच शिरोळमध्ये भाजपने जिल्हा परिषदेची अब्दुललाट तर स्वाभिमानीने उदगांव व नांदणीचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातच भाजपातील नेत्यांनी शिवसेनेला बरोबर घेण्याची तयारी सुरु केली आहे. एकूणच युती व आघाडीत सध्यातरी बिघाडीच दिसून येत आहे.
शिरोळमध्ये तिकीट वाटप करताना ‘पक्ष’परीक्षा
By admin | Published: January 31, 2017 11:01 PM