पतंगराव हे दूरदृष्टीचे नेते : डी. वाय. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:00 AM2018-03-11T00:00:43+5:302018-03-11T00:00:43+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम हे अत्यंत दूरदृष्टीचे नेते होते. एखादी गोष्ट हातात घेतली की, ती पूर्णत्वास नेण्याची जिद्द त्यांच्यात होती,
कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम हे अत्यंत दूरदृष्टीचे नेते होते. एखादी गोष्ट हातात घेतली की, ती पूर्णत्वास नेण्याची जिद्द त्यांच्यात होती, अशा शब्दांत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी भावना व्यक्त केल्या. डी. वाय. पाटील म्हणाले, ‘पतंगराव यांचे मन स्वच्छ होते. ते जेवढे राजकीय नेता म्हणून मोठे होते, तेवढेच ते माणूस म्हणूनही मोठे होते. त्यांचे माणूसपण मला कायमच भावले. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी झाली. त्यांच्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता होती; परंतु नियतीने त्यांना हिरावून नेले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ््याचे संबंध होते म्हणूनच त्या त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी स्वत:हून आल्या. काँग्रेस व गांधी घराण्याशी अविचल निष्ठा असलेला हा नेता होता. काँग्रेसमधील कर्तृत्ववान व धडाडीचा नेता हरपला, याचे खूप दु:ख होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचीही मोठी हानी झाली. पतंगराव यांच्या कुटुंबीयांशी माझे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. त्यांच्या पत्नी या माझ्या सख्ख्या बहिणीसारख्या आहेत व विश्वजितला मी माझ्या चार मुलांप्रमाणे पाचवा मुलगा मानतो. पतंगराव यांनी शिक्षणक्षेत्रात जी उत्तुंग कामगिरी केली, त्याची इतिहासालाही नोंद घ्यावी लागेल.’