‘गडहिंग्लज’मध्ये लोक माहिती अभियान
By admin | Published: November 4, 2015 10:13 PM2015-11-04T22:13:08+5:302015-11-05T00:01:23+5:30
६ ते ८ नोव्हेंबरला आयोजन : केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम
गडहिंग्लज : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने दिनांक ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान गडहिंग्लज येथे ‘लोक माहिती अभियान’ आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रसारणचे वरिष्ठ अधिकारी सय्यद अख्तर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी कुणाल खेमणार, तहसिलदार हनुमंतराव पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अख्तर यांनी सांगितले की, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांच्या सहकार्याने देशभरात शंभरहून अधिक ठिकाण लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात येते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहचाव्यात तसेच योजनांची अंमलबजावणी करणारी कार्यालये व लाभार्थी यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा हा या अभियानाचा उद्देश आहे.
दिनांक ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या अभियानात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणारी केंद्र सरकार, राज्यशासन, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची कार्यालये, महामंडळे, बँका तसेच स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. विविध ५० स्टॉल्सच्या माध्यमातून निरनिराळ्या शासकीय योजनांची माहिती लोकांना दिली जाणार आहे. तीन दिवसाच्या अभियानात पहिल्या दिवशी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच शेतकरी मेळावा, दुसऱ्या दिवशी महिला मेळावा व तिसऱ्या दिवशी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध विभागांचे तज्ज्ञ ग्रामीण विकास, आरोग्य, कृषि आदी विषयक योजना, रोजगार, एकात्मिक बालविकास, कौशल्य वर्धन आदींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सर्वांना मोफत प्रवेश असून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)
विनामूल्य आरोग्य सेवा
अभियानादरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि जिल्हा रूग्णालयाकडून तीनही दिवस रक्तगट तपासणी, डोळे तपासणी तसेच कान तपासणी आदी सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत.
मनोरंजनातूनही जनजागृती
या तीन दिवसांत गीत व गायक विभागातर्फे मनोरंजनातून जनजागृतीचे कार्यक्रम सायंकाळी ५ ते ९ यावेळेत आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह मराठी चित्रपटांचा समावेश आहे.