जलव्यवस्थापनात लोकांचा दबावगट हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:01 AM2018-03-12T00:01:13+5:302018-03-12T00:01:13+5:30
गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिला.
गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर फौंडेशनतर्फे कै. केदारी रेडेकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. याप्रसंगी ‘जलव्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फौंडेशनच्या अध्यक्षा अंजना रेडेकर होत्या. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि नद्या-नाले वाहते ठेवून निसर्गाचे जलचक्र अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरंदरे म्हणाले, २००५ मध्ये जलनियमनाचा कायदा होऊनदेखील १३ वर्षांत अजूनही जलआराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यातील बांधकामाधिन सुमारे ४०० प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी सुमारे ७५ हजार कोटींची गरज आहे. तरीदेखील १९१ नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार त्यासाठी ६८ हजार कोटी लागणार आहेत. मग, हे प्रकल्प कधी आणि कसे पूर्ण होणार? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच जलव्यवस्थापन आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे गरजेचे आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, प्राचार्या डॉ. वीणा कंठी, श्रद्धा शिंत्रे, कॉ. दत्ता अत्याळकर, विष्णुपंत केसरकर, अरुण देसाई, सतीश पाटील, नागेश चौगुले, आदी उपस्थित होते. रेडेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
सुभाष धुमे यांनी स्वागत केले. फौंडेशनचे सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एस. डी. पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. अॅड. सयाजी पाटील यांनी मानपत्र वाचन केले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत पाटील यांनी आभार मानले.
पुरस्काराची रक्कम ‘चळवळी’ला
पुरंदरे यांनी २१ हजारांच्या पुरस्कारात स्वत:चे चार हजार घालून २५ हजार रुपयांची मदत रेडेकर फौंडेशनने हाती घेतलेल्या पाण्याच्या चळवळीसाठी दिली. रोख २१ हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.