लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान झाले आहे. वादळाचा मालवण तालुक्यालादेखील फटका बसला. येथील विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा पूर्णतः बंद पडला होता. पाऊस, वादळी वारा अशा परिस्थितीतही विद्युत पुरवठा सुरु करण्यात उदगाव, कोथळी, चिंचवाड, कवठेगुलद येथील महावितरणाच्या पथकाने सहभाग नोंदवत कामगिरी बजावली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विरण ते कुंभारमाठ गाव ते मालवण अशी २८ किलोमीटरची उच्चदाब वाहिनी बंद पडली होती. ह्या भागात असणाऱ्या डोंगरातून जवळपास ७५ खांबांवर जीवाची पर्वा न करता, काम पूर्णत्वास नेले. येथील ९ पीन इन्सुलेटर्स बदलून सलग ३६ तास हे काम सुरु होते. गेले चार दिवस सकाळी सात वाजल्यापासून हे काम सुरू आहे. या टीमचे नेतृत्व शाखा अभियंता शशिकांत माने करत आहेत. तसेच देवबाग व तारकर्ली या भागातसुद्धा रात्री उशिरापर्यंत कसोशीचे प्रयत्न करून ११ के. व्ही. देवबाग वीजवाहिनी सुरळीत करण्यात या टीमला यश आले.
या टीममध्ये शाखा अभियंता शशिकांत माने, प्रधान तंत्रज्ञ गजानन परिट, वरिष्ठ तंत्रज्ञ वीरभद्र बसापुरे, वर्धमान पाटील, नवनाथ देवकर, आशुतोष बभिरे, विजय कांबळे यांचा समावेश आहे.
-
याठिकाणी विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित होता. माझ्या टीमने जंगलात सलग ३६ तास काम करून मालवणचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. टप्प्याटप्प्याने सर्व विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
शशिकांत माने, शाखा अभियंता.
फोटो ओळ - विरण (ता. मालवण) येथे खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करताना महावितरणचे शशिकांत माने, वीरभद्र बसापुरे व कर्मचारी.