भगवान महावीर यांचे तत्त्वज्ञान जगाला महाविनाशापासून वाचवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:23 AM2021-04-25T04:23:57+5:302021-04-25T04:23:57+5:30
कोल्हापूर : भगवान महावीर यांचे अहिंसात्मक तत्त्वज्ञानच जगाला महाविनाशापासून वाचवेल, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. ...
कोल्हापूर : भगवान महावीर यांचे अहिंसात्मक तत्त्वज्ञानच जगाला महाविनाशापासून वाचवेल, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. व्ही. बी. ककडे यांनी व्यक्त केला.
भगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ यू ट्यूब वाहिनीवरील ‘शिव वार्ता संवाद’ या कार्यक्रमांतर्गत ‘महावीर की महाविनाश?’ या विषयावर डॉ. ककडे यांची विशेष मुलाखत जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतली.
डॉ. ककडे म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीची अपरिमित हानी, सत्तासंघर्ष, संपत्तीचे केंद्रीकरण आदी अनेक कारणांनी जग एका मोठ्या विनाशाकडे निघाले आहे. या विनाशापासून जगाला वाचवायचे असेल तर भगवान महावीरांच्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या मूल्यांचा अंगीकार प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर करावयास हवा. भगवान महावीरांनी कोणत्याही देवाची अगर व्यक्तीची पूजा केली नाही, तर त्यांनी सदैव या मानवी मूल्यांचीच उपासना केली. एखाद्या विषयावर साकल्याने सर्वंकष विचार करणे हा सम्यक दर्शनाचा विशेष आहे. त्यापुढील पायरी म्हणजे सम्यक ज्ञान आहे. अर्थात एखाद्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त करवून घेणे. या दोन पायऱ्या आज जगाने बऱ्यापैकी गाठलेल्या आहेत. तथापि, अद्याप सम्यक चारित्र्यापर्यंतचा प्रवास आपल्याला करावयाचा आहे. त्यासाठी भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान मुळापासून समजावून घेण्याची, अंगीकृत करण्याची गरज असल्याचेही ककडे यांनी सांगितले.
चाैकट ०१
अध्यासन केंद्राची ग्रंथमाला
महावीर अध्यासनातर्फे जैन धर्मातील २४ तीर्थंकर आणि त्यांच्या योगदानाची, शिकवणीची किमान माहिती लोकांना व्हावी, यासाठी २४ पुस्तकांची ग्रंथमाला प्रकाशित केली आहे. जैन धर्मातील कोणीही आंतरजातीय विवाह केला, तर जैन तत्त्वज्ञानाची माहिती त्यांना व्हावी, यासाठी हा संच भेट देण्याचा उपक्रम समाजात राबवला जात आहे.