फिनिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:25 AM2018-12-24T00:25:34+5:302018-12-24T00:25:39+5:30

महाद्वार रोडने जात असताना अचानक एक स्कूटर माझ्याजवळ येऊन थांबली. ‘काकू, काकू, प्लीज थांबा ना.’ तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या एका ...

Phoenix | फिनिक्स

फिनिक्स

Next

महाद्वार रोडने जात असताना अचानक एक स्कूटर माझ्याजवळ येऊन थांबली. ‘काकू, काकू, प्लीज थांबा ना.’ तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या एका गॉगलधारी तरुणीनं मला थांबवलं. ‘ओळखलंत का मला?’ तिचा बुरखा हटवत तिनं मला विचारलं. मी तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यचकित होऊन तिला म्हटलं, ‘सुवर्णा तू?’ तिने अत्यानंदाने भररस्त्यात मला मिठीच मारली. तिला किती बोलू, किती नको असं झालं होतं म्हणून जवळच्याच हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. तिने माझी आवड लक्षात ठेवून वेटरला सहज आॅर्डर दिली. अधून-मधून वाजणाºया मोबाईलवर ती इंग्रजीतून लीलया संवाद साधत होती. मी तिचं निरीक्षण करत होते. मला आठवत होती पाच-सहा वर्षांपूर्वीची सुवर्णा...
बेताची आर्थिक परिस्थिती असलेलं आई-वडील, दोन मुली असं हे कुटुंब आमच्या शेजारी राहायला आलं होतं. अर्धांगवायूनं अंथरुणाला खिळलेले वडील. स्वभावानं तापट-हेकेखोर, कदाचित परिस्थितीमुळं हतबल झाले असावेत; पण बायको-मुलींशी सतत अर्वाच्य भाषेत बोलायचे. आई-मुली नेहमी दडपणाखाली असायच्या. आर्थिक परिस्थितीबरोबर मानसिक दबावामुळे सारे घर शरीर प्रकृतीनेही नाजूक बनलं होतं. गॅलरीत कधीतरी कपडे सुकवण्याच्या निमित्तानं नुसतं हसणं, एखाद्या शब्दाची देवघेव असं करत आमचा परिचय झाला. घट्ट झाकलेलं संपर्काचं दार हळूहळू किलकिलं व्हायला लागलं. सुवर्णा आणि तिची बहीण माझ्याशी चक्क हसून बोलायला लागल्या.
त्यांच्या बोलण्यातून सुवर्णा बी.कॉम. फर्स्ट क्लास, तर तिची बहीण एम.एस्सी. फर्स्ट क्लास असल्याचं समजलं. मी त्यांना नोकरीविषयी विचारलं, तर मोठ्या बहिणीने नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडून परधर्मातील मुलाशी लग्न केले. त्याचा वडिलांना त्रास झाल्याने या दोघींच्या नोकरी करण्याला त्यांचा पूर्ण विरोध होता. स्वेटर शिकण्याच्या निमित्ताने सुवर्णा माझ्याकडे यायला लागली.
कोणत्याही गोष्टीला ठाम नकार हे तिच्या स्वभावाचं वैशिष्ट्य. एखादा पदार्थ खायला दिला तर तो तिला कसा अपायकारक आहे, याचीच चर्चा व्हायची. परिस्थितीमुळं बाबांकडील नातेवाइकांची बोलणी ऐकावी लागायची. केवळ मामाचा आधार होता. ती माझ्याकडे आली की, तिच्या मनावर हळूवार फुंकर घालायचं काम मी हाती घेतलं. अगदी साध्या साध्या गोष्टींतून शिकवणी सुरू झाली. प्रत्येक गोष्टीतील तिची स्वत:विषयीची नकारात्मक भूमिका मला खोडून टाकायची होती. तिचा काही खायचा नकार घालविण्यासाठी सुचवलं, तू डिशभर खाऊ नकोस, पण चमचाभर पदार्थ खाऊन त्याची पावती दिलीस तर तुला त्रास होणार नाहीच; पण समोरचा माणूस आनंदी होईल. तुझ्याविषयी त्यांचे मत बदलेल, नकारात्मक भूमिका नाहीशी होईल. हळूहळू तिच्यात सकारात्मक बदल घडू लागला. आत्याशी बोलून बाबांकडून नोकरीची परवानगी मिळविली. अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या.
आमच्या ओळखीच्या सीएकडे तिच्यासाठी शब्द टाकला. त्यांना तिच्याविषयी कल्पना दिली. तिची नोकरी सुरू झाली. बाहेरची कामे करण्यासाठी स्कूटर शिकली. पुणे शहरात कुठंही स्कूटरवरून सहज फिरू लागली. तिच्या कामाची धडाडी पाहून तिच्या सरांनी स्वत:ची मुलगी समजून तिला घडवलं. तिच्या प्रगतीचा आलेख उंचावत होता. बदलीच्या निमित्तानं आम्ही पुणं सोडलं, तेव्हापासून तिची काहीच खबरबात नव्हती.
आज या सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं मी पाहिलं. आॅडिटच्या कामानिमित्त ती कोल्हापुरला आली होती. आम्ही दोघी अंबाबाईचं दर्शन घ्यायला गेलो. सुवर्णाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला.
मी कुणी समुपदेशक नाही. मी सामान्य गृहिणी. माझ्या नकळत केलेल्या सकारात्मक प्रयत्नांचं हे फलित. आज मन फक्त आनंदानं काठोकाठ भरून राहिलं आहे.
स्नेहल कुलकर्णी

Web Title: Phoenix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.