कोल्हापूर: आरटीओ कार्यालयातील राष्ट्रपुरुषांचे फोटो काढले, शिवसेनेने अधिकाऱ्यास धारेवर धरले
By सचिन भोसले | Published: August 18, 2022 04:18 PM2022-08-18T16:18:27+5:302022-08-18T16:23:37+5:30
प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करीत या प्रतिमा योग्य त्या आकारात व राजशिष्टाचारानूसार लावण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कक्षातील राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा राज शिष्टाचारानूसार लावलेल्या नव्हत्या. त्या योग्य आकारात नसल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांना धारेवर धरले. यावेळी स्वत: पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करीत या प्रतिमा योग्य त्या आकारात व राजशिष्टाचारानूसार लावण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे एक कार्यकर्ते कामानिमित्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटण्यास गेले होते. या दरम्यान त्यांच्या कक्षामध्ये पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या योग्य त्या आकारात प्रतिमा नव्हत्या. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीबा फुले यांच्याही प्रतिमा नुतनीकरण करताना काढलेल्या होत्या. त्या पुन्हा लावलेल्या नव्हत्या. याचा जाब संबधित कार्यकर्त्यांने विचारला. त्या लवकरच लावण्यात येतील असे स्पष्टीकरण पाटील यांनी केले. याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी शिवसेनेच्यावतीने आंदोलन पुकारले.
जाब विचारण्यासाठी गुरुवारी सकाळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहचले. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला. आंदोलकांनी राष्ट्रपुरूषांच्या योग्य त्या प्रमाणातील प्रतिमा आणून त्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांच्या कक्षात लावण्यासाठी नेल्या. तत्पुर्वीच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तेथे प्रतिमा लावल्या होत्या. मात्र, त्या योग्य राजशिष्टाचारानूसार नव्हत्या. त्यानंतरही कार्यकर्ते पुन्हा संतप्त झाले. याबद्दल पाटील यांच्यावर जिल्हा प्रमुख पवार व देवणे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अखेरीस पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करीत राजशिष्टाचारानूसार प्रतिमा लावण्याची ग्वाही आंदोलकांना दिली. त्यांनतर आंदोलक शांत झाले.
यावेळी राजू जाधव, चंद्रकांत भोसले, संजय जाधव, राजेंद्र पाटील, दिनेश परमार, हर्षल सुर्वे, मंजित माने, दत्ताजी टिपुगडे, कमलाकार जगदाळे, शशिकांत बिडकर, श्रीकांत सोनवणे, धनाजी दळवी, धनाजी यादव, दिलीप जाधव, स्वरूप मांगले, अवधूत साळोखे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.