कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून असलेल्या उष्णतेचा पारा शनिवारी हळूहळू खाली आला. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी शहरातील पारा ३९ अंशाच्या खाली गेला. पहाटे तर चक्क धुके पसरले होते. जिल्ह्यात सर्वाधिक कमाल ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोल्हापुरात झाली. कमाल तापमानातही दोन ते तीन अंशांनी घट झाली.आठवड्याच्या सुरुवातीलाच कोल्हापुरातील उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. तब्बल ४१ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेल्याने अंगाची लाहीलाही झाली होती. अशा परिस्थितीत नागरिक घराबाहेर पडत नव्हते. मात्र, हवामानातील बदलामुळे गेल्या आठवड्यात शहरांसह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे हवेतील गारवा वाढला होता.जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी ४० अंशांवर पोहोचलेले कमाल तापमान दोन दिवसांनंतर ३८ अंशांपर्यंत खाली आले आहे. शहराच्या बहुतांश भागातील कमाल तापमान ३७ ते ३८ अंशांच्या खाली गेल्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. मात्र, किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. तापमान कांहीसे घसरले असले तरी उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस उन्हाचा पारा कमी राहील असा अंदाज हवामानतज्ञांनी व्यक्त केला आहे.
तापमानात काहीशी घट अपेक्षित -लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान म्हणजे ६ आणि ७ मे रोजी कदाचित कमाल आणि किमान अशा दोन्हीही तापमानात काहीशी घट होवून सध्याच्या वातावरणापासून काहीसा दिलासाही मिळू शकतो, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
वातावरणातील बदलामुळे धुके -कोल्हापूर शहर आणि उपनगरात शनिवारी पहाटे सूर्योदयानंतर तासभर धुक्याची दुलई पसरलेली होती. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना हे धुके अनुभवायला मिळाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हवामान तज्ञांनी हा बदल वातावरणामुळे असेल असा अंदाज व्यक्त केला असला तरी हा बदल अनपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले आहे.