महापालिकेच्यावतीने एक वर्षाच्या आतील बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:41+5:302021-07-14T04:29:41+5:30
कोल्हापूर : न्यूमोनिया, मेंदूज्वर आणि सेप्टी सेमिया या गंभीर आजारांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपलब्ध ...
कोल्हापूर : न्यूमोनिया, मेंदूज्वर आणि सेप्टी सेमिया या गंभीर आजारांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली असून प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते मंगळवारी या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
सानेगुरुजी वसाहत येथील बीडी कामगार चाळ येथील अंगणवाडी क्रमांक ११५ या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बाहय संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदक हर्षदा, जिल्हा माता संगोपन अधिकारी फारुख देसाई उपस्थित होते.
कोरोना कालावधीत आरोग्य विभाग अत्यंत चांगली कामगिरी करीत आहे. आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाद्वारे आपल्या लहान बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण होणार असल्याने आपल्या ० ते १ वर्षाच्या आतील बालकांना नियोजित वेळेनुसार ही लस आवश्यक द्यावी, असे आवाहन बलकवडे यांनी केले आहे.
नियमित लसीकरणामध्ये या व्हॅक्सिनचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे. शासन निर्देशाप्रमाणे हे लसीकरण राबविण्यात येणार आहे. ही लस महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लसीकरणाचा जास्तीजास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी लसीकरण अधिकारी डॉ. रुपाली यादव यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, बालरोगतज्ज्ञ डॉ. विश्वजित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, फुलेवाडी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील नाळे व केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
- कधी दिली जाणार ही लस?
० ते १ वर्षाच्या आतील बालकांना पालकांनी ही लस द्यावी. यामध्ये पहिला डोस दीड महिन्यामध्ये, दुसरा डोस साडेतीन महिन्यामध्ये व तिसरा डोस नवव्या महिन्यात बुस्टर डोस म्हणून दिला जाणार आहे.
फोटो क्रमांक - १३०७२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर महापालिकेच्यावतीने एक वर्षाच्या आतील बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन लसीकरण मंगळवारपासून सुरू झाले. या लसीकरणाचा शुभारंभ प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाला.