कोल्हापूर : संभाजीनगर रेसकोर्स नाका येथे दोघा जणांनी पोलीस असलेची बतावणी करुन परभणीच्या वृध्दाला लुटले. त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, अंठी व ब्रेसलेट असा सुमारे दीड लाख किंमतीचा ऐवज काढून घेत पोबारा केला. सोमवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली.
अधिक माहिती अशी, राजेश्वर भिमाशंकर महाजन (वय ६९, रा. महाजन गल्ली, सोनपेठ, जि. परभणी) यांचे जावई धनराज गवरशेटे हे शिवराय नगरी, संभाजीनगर येथे राहतात. नातीच्या लग्नासाठी महाजन कुटूंबिय दि. १२ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरत आले आहे.
महाजन यांना सकाळी फिरायची सवय असल्याने ते सोमवारी सकाळी महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन घेवून परत येत असताना रेसकोर्स नाका येथे पाठिमागुन दूचाकीवरुन एक अज्ञात तरुण आला. त्याने महाजन यांना मी पोलीस आहे असे सांगुन ओखळपत्र दाखविले.
मी रात्री गांजा पकडला असून त्याची चौकशी सुरु आहे. हे बोलत असताना पुढे काही अंतरावर आणखी एक तरुण उभा होता. त्याच्या हातामध्ये छोटीशी बॅग होती. त्यालाही त्याने तुझ्या हातात काय आहे अशी विचारणा केली. त्याची बॅग उघडून खिसा तपासला. त्यातून रुमाल व साहित्य काढून ते रुमालात बांधून घेतले. महाजन हा सर्व प्रकार पाहत होते.
त्यांचेही खिसे तपासून अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. त्यांनी गळ्यातील चेन, हातातील अंगठी व ब्रेसलेट काढले. त्या अनोळखी तरुणाने दागिने रुमालात ठेवण्यास सांगून तो समोर उभ्या असलेल्या तरुणाच्या बॅगेत ठेवण्यास दिला. काही वेळ बॅगेत ठेवून तरुणाने पुन्हा रुमाल काढून दिला.
भेदरलेल्या अवस्थेत महाजन रुमाल खिशात ठेवून तेथून घरी आले. याठिकाणी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये दागिने नसल्याचे दिसून आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी जावई व मुलीला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
संशयित दोघेही लुटारु हे ४० ते ४५ वयोगटातील आहेत. दूचाकीवरुन आलेला शरिराने मजबूत आहे. त्याने अंगात निळसर रंगाचा शर्ट, फिक्कट निळ्या रंगाची जिन्स पँन्ट, डोक्यावर टोपी होती. तर रस्त्यावर उभा असलेला दूसरा साथीदार हा अंगाने सडपातळ, अंगात लालसर रंगाचा चौकडा फुल शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट असा पेहराव होता. या वर्णनानुसार जुनाराजवाडा पोलीसांनी संभाजीनगर रेसकोर्स नाका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये हे दोघेजी लुटारु दिसत असून त्यांचा शोध घेत आहेत.लुटमारीच्या प्रकाराने नागरिक भयभितशहरात गेल्या महिन्याभरापासून लुटमारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलीसांच्या नावाचा व बनावट ओळखपत्राचा गैरवापर करुन नागरिकांचा विश्वास संपादन करीत लुटले जात आहे. या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभित झाले आहेत. संशयितांची हेअर स्टाईलही पोलीस कट सारखी आहे. त्यामुळे त्यांनी उभेउभ पोलीस असल्याचा पेहराव करुन रात्री सोडा दिवसाही नागरिकांना लक्ष केले आहे.