उदगाव/शिरोळ : साखर कारखानदारांनी अजूनही उसाची थकीत एफआरपी दिली नाही. ती १५ टक्के व्याजासह मिळावी. यासाठी सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथील टोलनाक्यावर बुधवारी आंदोलन अंकुशच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलक दुपारपर्यंत न उठल्याने पोलीस व आंदोलकांत झटापट झाली. त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
उसाच्या थकीत एफआरपीसाठी गेल्या पाच दिवसांपासून तहसीलदार कार्यालयात आंदोलन सुरू आहे. कारवाईची नोटीस काढण्यासाठी तहसीलदारांकडून टाळाटाळ होत असल्याने बुधवारी दुपारी १२ वाजता उदगांव येथे सांगली-कोल्हापूर महामार्गालगत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. त्यामुळे आंदोलन थांबवावे, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी सांगितले, तर आम्हाला अर्धा तासाची मुदत द्यावी. बैठकीतील विषय कळेपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका धनाजी चुडमुंगे यांच्यासह आंदोलकांनी घेतली. यातच पोलीस व आंदोलकांत झटापट झाली.
आंदोलनात जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, अक्षय पाटील, कृष्णराव देशमुख, राकेश जगदाळे, आदम मुजावर, प्रमोद बाबर, दत्तात्रय जगदाळे, अनिल सुतार, संजय भाऊसाहेब चौगुले, अप्पासाहेब कदम, दीपक पाटील, श्रीपाद जगदाळे, सहभागी झाले होते.
--------------------------------------
चौकट - जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आश्वासनानंतर आंदोलन अंकुशने आंदोलन मागे घेतले. रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जप्तीच्या नोटिसा काढण्याबाबत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने शिरोळमधील ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती चुडमुंगे यांनी दिली.
-----------------------------------------
चौकट - आंदोलकांवर गुन्हे
कोविड नियमांचे उल्लंघन
तसेच रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. यावेळी धनाजी चुडमुंगे, अक्षय पाटील, प्रमोद बाबर, दत्तात्रय जगदाळे, यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
फोटो - २३०६२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथे पोलीस व आंदोलकांची झटापट झाली. (छाया : अजित चौगुले, उदगाव)