संदीप बावचे ।जयसिंगपूर : ग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. सणासुदीचे दिवस असले तरी चोखपणे कर्तव्य बजावणी करावी लागते. पोलीस कर्मचाºयांवर यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. मात्र, अनेक वर्षापासून तीच कर्मचाºयांची संख्या शिरोळ तालुक्यात अजूनही कायम आहे. ५४ गावांचा भार सुमारे १३५ अधिकारी व पोलिसांच्या खांद्यावर आहे. गावांची संख्या पाहता पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड ही तीन पोलीस ठाणी असून, नृसिंहवाडी येथे पोलीस चौकी आहे. जयसिंगपूर येथे उपविभागीय कार्यालय असून, शिरोळ पोलीस ठाण्याकडे एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, जयसिंगपूरकडे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, तर कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक असे अधिकारी असून तीनही पोलीस ठाण्यांतर्गत एकूण १३५ पोलीस कर्मचाºयांची संख्या आहे.
प्रतिनियुक्ती, पोलीस बंदोबस्त, गार्ड बंदोबस्त याशिवाय साप्ताहिक सुट्ट्या यामुळे पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणाºया कर्मचाºयांची संख्या पाहता ती अपुरीच आहे. दिवसेंदिवस शहरी व ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे याशिवाय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका, महाविद्यालयीन व शालांत परीक्षा, मतदान केंद्रासह येणारे सण आणि लोकप्रतिनिधींचे कार्यक्रम येथे सुरक्षा व्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवरती असते. ही जबाबदारी पार पाडताना कर्मचारी संख्या कमी असल्याने कामाचा अतिरिक्त ताण येतो.दिवाळी असो की दसरा, नवरात्र असो की गणेशोत्सव, ईद असो की मोहरम पोलीस प्रशासन सर्वसामान्यांच्या सेवेत असतात. मोठमोठे सण त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांसोबत साजरे करावयास मिळत नाहीत. गृहविभागाच्या दुर्लक्षामुळेच अनुशेष भरला जात नसल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनाच्या अनेक समस्यांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.नवीन निवासस्थानांची गरजजयसिंगपूर येथील पोलीस निवासस्थानाच्या इमारतींची दुरवस्था असतानाही अनेक कुटुंबे येथे राहात आहेत. अनेक समस्यातून पोलीस कर्मचाºयांना मार्ग काढावा लागत आहे. निवासस्थाने आहेत की खुराडी, असा प्रश्न त्यांना पडतो. शहरांचा विस्तार वाढला मात्र कर्मचाºयांची निवासस्थाने वाढली नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नवीन निवासस्थाने उभारण्याची गरज बनली आहे. कुरुंदवाडमध्येही निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.