कोल्हापूर : जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आहे. गरज भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला हे प्रशिक्षित पोलीस मदत करणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.गतवर्षी आंबेवाडी, चिखली, वडणगे या गावांसह शहरातील नागाळा पार्क, बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, लक्षतीर्थ, कसबा बावडा, आदी भागांना महापुराचा मोठा फटका बसला. महापुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुस्थळी स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस यंत्रणा आणि सेवाभावी संघटनांनी मोठे योगदान दिले.
त्यावेळी पुराच्या पाण्यातून बोटीने मार्ग काढत जाताना पाण्याचा प्रवाह, पाण्याखालील गावांचा भाग, विद्युत खांब, झाडी, मोठ्या इमारती यांची माहिती पोलिसांना नव्हती. त्यातच बोट चालविण्याचे कौशल्य नसल्याने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागले.
परजिल्ह्यांतून बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्त गावांच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नव्हती; पण तशी आपत्कालीन परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास अडचण येऊ नये, ही उणीव ओळखून जिल्हा पोलीस दलातील व पूरग्रस्त क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.या आपत्ती व्यवस्थापनात पूरपरिस्थितीत अडकणारी संभाव्य गावे, त्यांची भौगोलिक रचना, मदतीसाठी तेथे जाण्याचे व परतण्याचे मार्ग, महापुरात बोट चालविण्याचे कौशल्य, पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्यासह जवळपास ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले आहे.सध्या पावसाचा जोर वाढला असून धरणांतूनही पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्कालीन स्थितीत कोणत्याही क्षणी आवश्यकता वाटल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.