मुरगूडच्या शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Published: December 10, 2015 12:17 AM2015-12-10T00:17:38+5:302015-12-10T00:56:21+5:30

१६५ ठिकाणी जमीन भूसंपादनासाठी आरक्षण : नगरविकास खात्याच्या नोटिसीची होळी

Poor farmers' autobiography | मुरगूडच्या शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

मुरगूडच्या शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

Next

मुरगूड : नगर विकास खात्याने मुरगूड (ता. कागल) शहराच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये १६५ ठिकाणी विविध कारणांसाठी जमीन भूसंपादनासाठी आरक्षण टाकले आहे. या आरक्षणाला तीव्र विरोध करीत हरकतीच्या सुनावणीसाठी पाठविलेल्या शासनाच्या नोटिसीची संतप्त शेतकऱ्यांनी नगरपालिकेसमोरच होळी केली. शासनाने आपल्या भावना लक्षात घेतल्या नाही तर १६५ शेतकरी नगरपालिकेच्या समोर सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तणावपूर्ण वातावरणात हरकतीवरील सुनावणी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार पडली.
मुरगूड शहराच्या विकासाच्या दृष्टीने भविष्यात होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अंदाज घेऊन क्रीडांगण, प्राथमिक शाळा, शॉपिंग सेंटर, बगीचा, पाण्याची टाकी, जिम्नॅशिअम हॉल व अंतर्गत रस्ते, आदींसाठी १६५ शेतकऱ्यांच्या अंदाजे ३० ते ३५ एकर बागायत शेतीवरच नगरविकास खात्याने आरक्षण टाकलेले आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला, भूखंडधारकाला अंधारात ठेवून आरक्षणे टाकली आहेत. जर यामध्ये जमिनी गेल्या तर बरेच शेतकरी भूमिहीन होतील, असा आक्षेप घेत विकास आराखडा व आरक्षणाला भूखंडधारक व नगरपालिका प्रशासनाने विरोध केला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगरविकास खात्यामार्फत बुधवारी पालिकेच्या सभागृहात हरकती पार पडल्या. यासाठी पुणे नगररचना विभागाचे सहसंचालक पी. जी. भुक्ते, कोल्हापूर नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. एन. चव्हाण, सहायक नगररचनाकार कुलकर्णी, के. वाय. पाटील, के. पी. यादव, पासळकर यांचे पथक आले होते. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सुरुवातीलाच हरकतींवरील सुनावणीसाठी पाठवलेल्या नोटिसीची पालिकेसमोर होळी करीत शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी शंखध्वनी केला. यावेळी माजी नगरसेवक एम. डी. रावण यांनी आरक्षणे चुकीची असल्याबाबत पुरावे दाखल केले.
संजय भारमल म्हणाले, शहराचा विकास करीत असताना नापीक व पडीक जमिनीचाच वापर करावा, असे शासनाने सांगितले असताना त्याला हरताळ फासण्याचे काम मुरगूड आरक्षणामुळे झाले आहे. न्याय मिळाला नाही तर कायदेशीर आंदोलन लढण्याचा इरादा स्पष्ट केला. यावेळी विशाल सूर्यवंशी, विनायक रामले, विलासराव सूर्यवंशी, इस्माईल नायकवडी, उदय शहा, संदीप सूर्यवंशी उपस्थित होते. मागणीचे निवेदन नगररचना सहसंचालक पी. जी. भुक्ते यांना दिले. (वार्ताहर)


नगरपालिकेचा विरोध : शेतकऱ्यांनी घाबरू नये
नगरविकास खात्याकडून विकास आराखडा तयार करताना पालिका प्रशासनाला अंधारात ठेवले आहे. या आरक्षणाला आमचाही विरोध असून, या आरक्षणामुळे काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधाचा ठरावही संमत करणार आहोत.
- प्रवीणसिंह पाटील,
सभागृह नेता, मुरगूड नगरपरिषद


आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना धीर देत सहसंचालक पी. जी. भुक्ते यांनी सांगितले की, आपण घाबरून जाऊ नका. तुम्हाला डावलून शासन कोणताच निर्णय घेणार नाही. आपल्या संतप्त भावना मी वरिष्ठांना कळविणार असून, कोणाचेही नुकसान होणार नाही.

Web Title: Poor farmers' autobiography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.