पायऱ्या झिजवून नवरा मेला, माझा जीव हाय तोवर न्याय द्या
By भारत चव्हाण | Published: September 7, 2023 02:11 PM2023-09-07T14:11:07+5:302023-09-07T14:13:16+5:30
कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर एका महिलेने मांडली व्यथा
कोल्हापूर : ‘महानगरपालिका नगररचना विभागाच्या पायऱ्या झिजवून-झिजवून माझा नवरा मेला; पंधरा वर्षे सातत्याने तक्रारी करून दमलेय. आता माझा जीव हाय तोवर तर मला न्याय द्यावा,’ अशी विनवणी मंगळवार पेठेतील डाकवे गल्ली येथील मालती शिंदे यांनी केली. शिंदे या आपल्या चार मुलींना घेऊन बुधवारी नगररचना कार्यालयात प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना भेटायला गेल्या होत्या. त्यांच्यासमोर त्यांनी सारी व्यथा मांडली आणि नंतर त्या पत्रकारांशीही बोलल्या.
बुधवारी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत प्रशासक तक्रारी ऐकणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ३५ हून अधिक नागरिकांनी नगररचना कार्यालयात जाऊन प्रशासकांसमोर व्यथा मांडल्या. या सर्व तक्रारींचे पुढील एक महिन्यात निवारण करा, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मालती शिंदे या मंगळवार पेठेतील डाकवे गल्ली येथे राहतात. त्यांच्या १८ बाय ५४ फुटांच्या जागेवर शेजारील व्यक्तीने अतिक्रमण केलेय असा त्यांचा दावा आहे. त्यांचे पती या अतिक्रमणाबाबत नगररचना विभागाकडे तक्रारी करीत होते. ‘आज बघू, उद्या बघूया,’ असे अधिकारी सागंत होते.
नंतर ते मोजणी नकाशा आणा असे सांगत राहिले. बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांची भेट व्हायची नाही. कधी-कधी नुसती पाहणी करून जायचे. कारवाई काहीच होत नव्हती. शेवटी न्यायालयाकडून मोजणी मागून घेतली. ही मोजणी शिंदे यांच्या बाजूनेच होती. तिची अंमलबजावणी करा म्हणून आग्रह धरला तर त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. हा सगळा पाठपुरावा करत असताना शिंदे यांच्या पतींचे निधन झाले. बुधवारी मालती या चार मुलींना घेऊन प्रशासक मंजूलक्ष्मी यांना भेटायला गेल्या होत्या. त्यांच्यासमोर त्यांनी सारी हकीकत मांडली.
माजी सैनिकही मारताहेत फेऱ्या
सन १९६५ च्या युद्धात लढलेले माजी सैनिक दिनकर वाडकरही नगररचना कार्यालयातील कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यांच्या शेजारी एकाने घर बांधले असून मूळ नकाशात दरवाजा नसतानाही त्याने तेथे दरवाजा केला आहे. त्याचा आपल्याला त्रास होत असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यांनी तो दरवाजा बंद करण्याची कारवाई करावी, अशी मागणी प्रशासकांकडे केली आहे.