Coronavirus Unlock : ८०० रुपयांच्या भाड्याला भुलला आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:39 AM2020-06-25T11:39:24+5:302020-06-25T11:43:29+5:30
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामधून बुधवारी दुपारी एक पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. दोन तासांनी तो इचलकरंजी येथे घरी गेल्याचे समजल्यानंतर तेथून पुन्हा त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात आणण्यात आले. या प्रकाराने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.
कोल्हापूर -येथील सीपीआर रुग्णालयामधून बुधवारी दुपारी एक पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. दोन तासांनी तो इचलकरंजी येथे घरी गेल्याचे समजल्यानंतर तेथून पुन्हा त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात आणण्यात आले. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडे पैसे नव्हते. दोन-तीन रिक्षावाल्यांना त्याने इचलकरंजीला येता काय असे विचारले. कुणी तयार होईना; परंतु लॉकडाऊनच्या काळात भाडे न मिळालेला एक रिक्षाचालक ८०० रुपयांच्या भाड्यासाठी तयार झाला आणि इचलकरंजीला गेला. त्याला आता रुग्णालयात दाखल व्हावे लागले असून त्याचाही स्रावही घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेला ५५ वर्षांचा रुग्ण येथील सीपीआर रुग्णालयातील कोरोना विशेष उपचार कक्षामध्ये उपचार घेत होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास तो मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या जागेतून पोलिसांची नजर चुकवून बाहेर पडला. तेथून रिक्षा ठरवून त्याने थेट इचलकरंजीतील आपले घर गाठले. या प्रकाराने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.
इकडे रुग्ण बेडवर न दिसल्याने सर्वत्र धावपळ उडाली. अक्षरश: सर्व डॉक्टरांनीही शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारीही आले. इचलकरंजी येथील ज्या गल्लीत हा रुग्ण राहतो तिथल्या नागरिकांनी ही माहिती नगरपालिकेला दिली. अखेर हा रुग्ण आणि रिक्षाचालक अशा दोघांनाही पुन्हा दुपारनंतर सीपीआर रुग्णालयात आणून दाखल करण्यात आले.
चौकट