आबिटकर, सत्यजित कदम यांचे शक्तिप्रदर्शन
By Admin | Published: September 28, 2014 12:53 AM2014-09-28T00:53:52+5:302014-09-28T00:56:16+5:30
विधानसभा निवडणूक; भाजपच्या महेश जाधव यांचीही मोटारसायकल रॅली : ‘उत्तर’मधून शेकापही लढणार
कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कॉँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांनी, तर राधानगरी- भुदरगड मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी आज, शनिवारी जोरदारपणे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संभाजी देवणे यांनी अर्ज भरला. भाजपतर्फे महेश जाधव यांनीही मोटारसायकल रॅलीद्वारे जाऊन अर्ज भरला. सत्यजित कदम यांची रॅली स्टेशनरोडवरील कॉँग्रेस कार्यालयाजवळ आली असता माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे स्वागत केले. येथे झालेल्या छोट्या सभेत मालोजीराजे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. रवींद्र मोरे यांनी स्वागत केले. विक्रम जरग यांनी आभार मानले. रॅलीत पाचशेहून अधिक मोटारसायकली व पन्नासहून अधिक चारचाकी होत्या.
नगरसेवक दिगंबर फराकटे, राजाराम गायकवाड, संजय मोहिते, श्रीकांत बनछोडे, सरस्वती पोवार असे मोजके पाचच नगरसेवक होते. विशेष म्हणजे शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनीही अर्ज भरण्यास येण्याचे टाळले. सतेज पाटील यांना मानणारे सर्वच नगरसेवक गैरहजर होते.
महेश जाधव यांची रॅली
भाजपचे उमेदवार महेश जाधव यांनी बिंदू चौक येथील पक्षाच्या कार्यालयापासून मोटारसायकल रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या रॅलीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले.
‘शेकाप’ही लढणार
कोल्हापूर उत्तरमधून शेतकरी कामगार पक्षातर्फे आज अचानक मनीष प्रतापसिंह महागावकर यांनी अर्ज भरला. माजी आमदार संपतराव पवार-पाटील यावेळी उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज भरला. ‘मनसे’तर्फे सुरेश साळोखे यांनीही उमेदवारी अर्ज भरून कालच्या अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली.
प्रकाश आबिटकरांचा अर्ज
राधानगरी : राधानगरी-भुदरगड मतदारसंघासाठी आज, शनिवारी १६ उमेदवारांनी २५ अर्ज दाखल केले. शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल केलेल्यांत आमदार के. पी. पाटील व रणजितसिंह पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस), बजरंग देसाई, हिंदुराव चौगले, विजयमाला देसाई (राष्ट्रीय कॉँग्रेस), आण्णासाहेब नवणे (स्वाभिमानी शेतकरी संघटना), अरुण डोंगळे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, अशोक चराटी (सर्व अपक्ष), डॉ. राजीव चव्हाण (बहुजन मुक्ती पार्टी), उमेश कांबळे (ब्लॅँक पॅँथर), शहाजी कांबळे (रिपब्लिकन पार्टी), युवराज पाटील (मनसे) यांचा समावेश आहे.