- इंदूमती गणेश/आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर, दि. 21 - आदिमाता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रुपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली.
गुरूवारी पहाटेच्या अभिषेकानंतर सकाळी साडे आठ वाजता शेखर मुनिश्वर कुटुंबीयांकडून अंबाबाईची घटस्थापना करण्यात आली. तोफेची सलामी झाली की देवी बसली असे संबोधले जाते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. दुपारची आरती शंखतीर्थनंतर अंबाबाईची शैलपुत्री रुपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रुपांची पूजा व मंत्रानुष्ठान करण्याची प्रथा शाक्त तंत्रामध्ये आहे. त्यानुसार नऊ दिवस दुर्गेची नऊ रुपे पुजली जातात. नवदुर्गामधील प्रथम दुर्गा शैलपूत्री म्हणजे पार्वतीचेच एक रुप आहे. मस्तकावर अर्धचंद्र, वृषारुढ, हातात त्रिशुळ व कमळ असे देवीचे स्वरुप आहे. शैलपुत्री म्हणजे पर्वतराजाची पुत्री पार्वती. देवीचे स्वरुप शिवाशी एकरुप आहे. म्हणूनच वाहन म्हणून बैल आयुध म्हणून त्रिशूळ आणि मस्तकी अर्धचंद्र ही शिवाची लक्षणे आहेत. हातात असलेले कमळ हे तिचे शक्तीलक्षण आहे. ही देवता शिव आणि शक्तीचे संम्मीलित रुप असून शाक्त तंत्रामध्ये शैलपुत्री ही मुलाधार चक्राची स्वामिनी मानली जाते. वंदे वंछित लाभाय चंद्रार्धकृतशेखराम असा या देवतेचा ध्यानमंत्र आहे. या देविची मंदिरे क्वचितच पाहायला मिळतात. ही पूजा मयुर मुनीश्वर व मंदार मुनिश्वर यांनी बांधली.