कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेला कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ‘अष्टादशभूजा महालक्ष्मी रूपा’त पूजा बांधण्यात आली. ‘दुर्गासप्तशती’मधील मध्यम चरित्राची ही देवता असून, इथे महिषासूरमर्दिनीलाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले आहे.शनिवारी सकाळचा अभिषेक व दुपारची आरती झाल्यानंतर श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. अष्टादश म्हणजे अठरा हातांनी आणि सर्व देवांच्या अंशांनी युक्त अशी सिंहवाहिनी दुर्गा. महिषासूराचा वध करण्यासाठी देवतांनी आत्मतेजापासून या देवीची निर्मिती केली. दुर्गासप्तशती ग्रंथाची ही देवी प्रधान नायिका असून, देवीच्या अठरा हातांमध्ये अक्षमाला, परशू, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, कमंडलू, कालदंड, शक्ती, खड्ग, ढाल, शंख, घंटा, पानपात्र, शूल, पाश आणि चक्र अशी आयुधे आहेत.देवीचा रंग पोवळ्याप्रमाणे तांबडा असून, तिचे मुख धवल तर हात निळे कल्पिले आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश या तत्त्वांनी युक्त अशा या देवतेला सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांनी प्रसन्न करून घेतले. ही पूजा माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली. त्यांना रवी माईणकर यांनी साहाय्य केले.
कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाईची अष्टादशभुजा महालक्ष्मी रूपात पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:18 AM