गोविंद जठार यांनी फुटबॉलसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. खेळाडू म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय आहे. त्याचबरोबर त्यांनी मार्गदर्शन केलेल्या खेळाडू व संघाची यादी मोठी आहे. फुटबॉलबरोबरच हॉकी, क्रिकेट व जिमनॅस्टिकमध्ये ते पारंगत होते. राज्य शालेय संघात निवड झालेले ते कोल्हापूरचे पहिले खेळाडू ठरले.गोविंंद जठार यांचा जन्म १७ जुलै १९४९ रोजी मंगळवार पेठेत झाला. गोविंंद नऊ वर्षांचे असताना त्यांचे वडील विठ्ठलराव यांचे निधन झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलबाग येथील शिवराज विद्यालय व बिंंदू चौकातील शाळा क्रमांक दोन येथे झाले.शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामन्यांची रंगत, फुटबॉल पराक्रमाची चर्चा, पेठापेठांचा वर्चस्वासाठी चाललेला खेळ बालवयातच गोविंंद यांच्या नसानसांत भिनला. गल्ली-बोळांतून, बेलबागेत, शाहू दयानंद क्रीडांगण, शिवाजी स्टेडियम, साठमारी मैदान, प्रसंगी घरासमोरील रस्त्यावरच्या चौकात टेनिस बॉलच्या साहाय्याने ते दररोज खेळायचे. ४ फूट ११ इंच उंचीच्या स्पर्धा जिंंकण्याची ईर्षा मनात बाळगूनच गोविंंद यांचा डावा पाय चेंडूवर वर्चस्व गाजवू लागला. या उंचीच्या स्पर्धांमध्ये लेफ्ट आऊट या जागेवरून असंख्य गोल त्यांनी केले. सेंटर लाईनवरून टेनिस चेंडूची हाय ड्राईव्ह किक डाव्या पायाने मारून टेनिस बॉल गोलपोस्टमध्ये उतरून कधी स्कोअर झाला हे गोलकिपरला प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकून व समर्थकांनी गोविंंद यांना खांद्यावर घेऊन नाचविल्यानंतर समजत असे. ४ फूट ११ इंच उंचीचे सामने खेळण्याची प्रथम संधी त्यांना महाकाली फुटबॉल संघाने दिली.१९६४ साली गोविंंद माध्यमिक शिक्षणाकरिता नागोजीराव पाटणकर या शाळेत दाखल झाले. तेथे त्यांना जयसिंंग खांडेकर, डी. के. अतीतकर सर या दिग्गज फुटबॉल खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले. १९६४ ते ६८ पर्यंत झालेल्या केळवकर लीग, दामुआण्णा व शासकीय स्पर्धांतून गोविंंद यांचा खेळ नजरेत भरला. त्यांची महाराष्ट्र राज्य शालेय संघात निवड झाली. अशी निवड होणारे कोल्हापूर जिल्ह्यातील ते पहिलेच खेळाडू होय. गोविंंद यांच्या आयुष्यातील हे पहिले मोठे यश. यामुळे त्यांच्याकडे सर्व क्लबच्या नजरा वळल्या आणि सुबराव गवळी तालीम मंडळाच्या कसदार प्रॅक्टिस क्लबमध्ये वयाच्या १५ व्या वर्षापासून लेफ्ट आऊट या जागेवर त्यांनी खेळण्यास सुरुवात केली. गोविंंद १९८४ पर्यंत प्रॅक्टिसच्या लेफ्ट आऊट या जागेवर खेळत होते.गोविंंद यांची उंची पाच फुटांपेक्षा कमी होती. हेडिंंग, बॉल ड्रिबलिंंग, ट्रॅपिंग पे, फुटबॉलमधील सर्व किक्स त्यांना अवगत होत्या. ते जिम्नॅस्टिक तज्ज्ञ असल्याने लवचिकतेसह कमालीचे धावत असत. त्यांच्या पायात एकदा बॉल आला की दोन्ही पायांवर टॅकल करत लेफ्ट आऊटच्या बाजूनेच हमखास गोल होत असे. त्यांनी असंख्य गोल्स् करून प्रॅक्टिस क्लबला विजयश्री मिळवून दिला आहे. गोविंंद त्या काळात प्रॅक्टिस क्लबचे महत्त्वाचे खेळाडू होते. त्यांनी आपल्या खेळाने प्रेक्षकांच्या हृदयात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.१९७३ मध्ये एका स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त द्वारकानाथ कपूर आले होते. महापालिकेचा बलाढ्य संघ व प्रॅक्टिस यांच्यात सामना सुरू होता. सामन्यात कोणाचाच गोल होत नव्हता. कपूरसाहेबांनी शक्कल लढविली. प्रथम गोल नोंदविणाऱ्यास १०० रुपये बक्षीस. चुरस वाढली. पंढरीसारख्या प्रख्यात गोलरक्षकाला चकवत गोविंंद यांनी पहिला गोल केला व १०० रुपयांचे बक्षीस मिळविले. हा सामनाही प्रॅक्टिसने जिंकला. कपूरसाहेबांनी गोविंंद यांना शाबासकी दिली.गोविंद फुटबॉलशिवाय हॉकी, क्रिकेट व जिम्नॅशियम खेळांत तरबेज होते. आर्मी स्कूल (पुणे) येथील ट्रेनिंंग कोर्स, पटीयाळा (पंजाब) येथील ओरिएंटेशन फुटबॉल कोर्स त्यांनी केला होता. पिराजीराव घाटगे ट्रस्टमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. या काळात त्यांनी फुटबॉल, हॉकी, क्रिकेट व जिम्नॅस्टिकमध्ये अनेक खेळाडू घडविले. कुडित्रे - डी. सी. नरके विद्यानिकेतन, न्यू पॅलेस, जयभवानी, गडहिंंग्लज, शांतिनिकेतन सांगली या संघांना त्यांनी मार्गदर्शन केले. राजर्षी शाहू फुटबॉल फौंडेशनने त्यांचा सत्कार केला होता. असा हा फुटबॉल खेळातील चमकदार हीरा असंख्य खेळाडूंना प्रशिक्षण व आनंद देऊन अकाली काळाच्या पडद्याआड गेला. --प्रा. डॉ. अभिजित वणिरे(उद्याच्या अंकात : विश्वास कांबळे-मालेकर)
प्रॅक्टिस क्लबचा हिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 12:27 AM