जिल्ह्यात आठ लाखांवर वृक्षलागवडीची तयारी
By admin | Published: June 29, 2016 12:57 AM2016-06-29T00:57:50+5:302016-06-29T01:02:55+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ६ लाख लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असले तरीही प्रत्यक्षात अधिकारी व नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे ८ लाखांवर वृक्ष लागवडीची तयारी केली आहे तसेच २२२२ हेक्टर जमीन क्षेत्रावर सुमारे ५ हजार ८०० साईटवर हे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, दि. १ जुलैला एकाच दिवशी सर्वजण वृक्ष लागवड करणार असल्याने यास एकप्रकारे चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. जनजागृतीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे ६ लाख २५ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निश्चित केले असताना प्रत्यक्षात जिल्ह्यातील अधिकारी व नागरिकांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ८ लाख ८ हजार ५७७ खड्डे खोदले असून वृक्षलागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील वृक्षलागवडीचा प्रारंभ दि. १ जुलैला सकाळी ९ वाजता पालकमंत्री, दोन खासदार, सर्व आमदारांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आठ लाख खड्डे तयार
जिल्ह्यात वनविभागाच्यावतीने
३ लाख ७० हजार, सामाजिक वनीकरण ३५ हजार, इतर शासकीय विभाग व खासगी संस्थांतर्फे ४ लाख ३० हजार २७३ असे एकूण ८ लाख ८ हजार ५७७ खड्डे खोदून तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विजेच्या तारांखाली झाडे लावू नका
महापालिकासह सर्व संस्थांनी ही वृक्षलागवड विजेच्या तारांखाली करू नये तसेच भिंतीच्या शेजारी लावू नयेत, असेही आवाहन डॉ. सैनी यांनी केले आहे.
वृक्षदानास प्रतिसाद
ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अगर अपार्टमेंटमधील नागरिकांनी वृक्षदान जिल्हा प्रशासनाकडे करावेत. या योजनेतून आतापर्यंत २००० रोपे मिळाली आहेत. दहापेक्षा जादा रोपे देणाऱ्यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करणार असल्याचेही डॉ. सैनी यांनी सांगितले.
इचलकरंजी ग्रीन सिटी
कोल्हापूर शहराच्यापाठोपाठ इचलकरंजी शहरातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार असून हे शहर ग्रीन सिटी करण्यात येणार असल्याचेही डॉ. सैनी यांनी सांगितले.