जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर २५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जोतिबा नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, नवरात्र उत्सव काळात आरती सोहळा, घटस्थापना, ललिता पंचमी, जागर, खंडेनवमी, सीमोल्लंघन, शस्त्र पूजन, पालखी सोहळा, कमळ पुष्पातील महापूजा, आदी विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. श्री जोतिबाचा नवरात्र उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. मंदिरातील विद्युत यंत्रणा दुरुस्ती करण्यात येत आहे. दर्शन रांग व्यवस्था तसेच साफसफाई करण्यात येत आहे. सोमवारी (दि. २२) मंदिरात स्वच्छ पाण्याचे फवारे मारून ‘पाकाळणी’ होणार आहे. नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार (दि. २५ ) पासून होणार आहे. आरती सोहळ्याने घट बसविण्याचा विधी होईल. सलग नऊ दिवस श्री जोतिबाची आरती श्री यमाई मंदिराकडे निघते. २९ सप्टेंबरला ललित पंचमी होईल. श्री जोतिबाचा जागर दि. १ आॅक्टोबरला होणार आहे. ३ आॅक्टोबरला खंडेनवमी दिवशी सकाळी ८ वाजता पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. मंदिरात घट उठविणे, शस्त्र पूजन, आदी विधी होतील. तसेच नवरात्र उपवासाची सांगता होईल. सायंकाळी पालखी सोहळा दक्षिण दरवाजाकडे रवाना होईल. या ठिकाणी सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. (वार्ताहर)
जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवाची तयारी
By admin | Published: September 17, 2014 11:29 PM