बांधकाम सभापतींची कामे अध्यक्षांनी थांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:32 AM2021-06-10T11:32:17+5:302021-06-10T11:33:55+5:30
Zp Kolhapur- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी राजीनामा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. राजीनाम्यासाठी तयार नसणारे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटी रुपयांची कामे थांबवण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रच दिले आहे.
कोल्हापूर -जिल्हा परिषदेतील पदाधिकारी राजीनामा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. राजीनाम्यासाठी तयार नसणारे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटी रुपयांची कामे थांबवण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रच दिले आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा प्रश्न शिवसेनेच्या तिघाही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे न दिल्याने चिघळला आहे. शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू असून, स्वाती सासने आणि प्रवीण यादव यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. मात्र माजी आमदार सत्यजित पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही. जेव्हा सत्यजित पाटील सांगतील तेव्हा राजीनामा देणार, असे ते सांगत असून, त्यांनी राजीनामा दिला की आम्ही दोघेही राजीनामा देतो, अशी भूमिका यादव आणि सासने यांनी घेतली आहे.
या सगळ्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांना कालावधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी हंबीरराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काही स्पष्ट सूचना केल्याचे सांगण्यात आले. त्याही पुढे जात आता थेट अध्यक्ष बजरंग पाटील यांनाच कामांचे कार्यारंभ आदेश देऊ नयेत, असे लेखी पत्र दिल्यामुळे आता हे प्रकरण वेगळ्या टप्प्यावर आले आहे. पाटील हे बुधवारी दिवसभर जिल्हा परिषदेत नव्हते. मात्र ते गुरुवारी येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामा प्रकरण विनाकारण ताणवले जात असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलदेखील नाराज असल्याचे सांगण्यात येते.