संचालकांचा मोर्चासाठी दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:50 AM2017-12-04T00:50:30+5:302017-12-04T00:56:16+5:30
कोल्हापूर : निषेध मोर्चासाठी माणसे गोळा करण्यासाठी ‘गोकुळ’चे संचालक गावोगावी फिरत असून, ते उत्पादकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील यांनी पत्रकातून केला. हिंमत असेल तर दूध दरवाढीबाबत गावोगावी उत्पादकांचे मतदान घ्यावे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
दूध उत्पादकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आमदार सतेज पाटील यांनी केले. पण दूध दराबाबत न बोलता आमदार पाटील यांच्यावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम संचालकांचा सुरू आहे. दरवाढीच्या मोर्चासाठी जिल्ह्याच्या काना-कोपºयांतून शेतकरी सहभागी झाल्याने संचालकांचे धाबे दणाणले. हा मोर्चा त्यांच्या जिव्हारी लागल्याने ७ डिसेंबरला निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला दूध उत्पादक येतील की नाही, याबाबत शंका असल्याने संचालक संघाच्या स्कार्पिओ गाड्या उधळत गावोगावी मिटिंग घेत आहेत. संघातील खर्च कमी करण्याची आम्ही मागणी केली पण त्याकडे दुर्लक्ष करत संचालक नेहमीच्या रूबाबातच वावरत आहेत. किमान या वेळेला तरी संचालकांनी स्वत:च्या गाड्या वापरणे संयुक्तिक होते. उत्पादकांच्या भल्यासाठी आमदार पाटील यांनी लढा उभा केला आहे, त्याला पाठबळ देण्याची भूमिकाच उत्पादक घेतील. पन्हाळा-बावड्यातील दूध उत्पादकांच्या मेळाव्यात मोर्चाला येणार नसल्याचे उत्पादकांनी ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना सांगितले. त्यावरून उत्पादकांना दर कपात मान्य नाही, हेच सिद्ध होते. संचालकांनी कितीही दबाव आणला तरी स्वाभिमानी उत्पादक दबावाला अजिबात बळी पडणार नाहीत, ते सतेज पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील, असे पत्रकात म्हटले आहे.
गांधीगिरीने संचालकांचे स्वागत करा
दोन रुपये दर कपात केले त्याच्या समर्थनार्थ निषेध मोर्चा काढण्यासाठी सहभागी होण्यासाठी संचालक तुमच्या दारात येत आहेत. त्यांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करा. आम्हाला खात्री आहे, या मोर्चाला जिल्ह्यातील स्वाभिमानी उत्पादक येणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.