कोल्हापूर : नव्याने सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे बंद करावीत, पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांना शिकवण्यासाठी पुरोसा वेळ मिळावा यासाठी केंंद्र स्तरावर डाटा एन्ट्री आॅपरेटर नेमावेत, एमएससीआसटी मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढवण्यात यावी, शालेय पोषण आहार पुरवठा शासनानेच करावा व सर्व नोंदी अन्न शिजवण्याच्या यंत्रणेकडेच देवून फक्त नियंत्रणाचे काम मुख्याध्यापकाकडे असावे, सर्व उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर करावे, सर्व शळांना शिपाई व क्लार्क मिळावेत, शाळांची लाईट बिले भरण्यासंदर्भात अनुदान मिळावे, आंतरजिल्हा भरती झालेल्या पण अद्याप मुक्त न केलेल्या रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना तात्काळ मुक्त कारवे जिल्ह्यांचा अपूर्ण रोस्टर पूर्ण करावे. महापालिका शाळांचे वेतन अनुदान शासनाकडूनच शंभर टक्के मिळावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस.के. पाटील, गोविंद पाटील, शंकर पवार, गीता कोरवी, लक्ष्मी पाटील, अशोक खाडे, सुनिल पोवार, दिलीप भोई, अशोक पाटील, रंगराव वाडकर, प्रमिला माने, लतिका पाटील, मालती राजमाने, रेवती पाटील, भारती चोपडे, विद्या जाधव, संगिता भोई यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.