कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैदी व कुटुंबीयांची अश्रूंनी झाली गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 02:52 PM2017-11-24T14:52:51+5:302017-11-24T15:06:10+5:30

सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते.

prisoners meets family members in Kalamba Jail | कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैदी व कुटुंबीयांची अश्रूंनी झाली गळाभेट

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैदी व कुटुंबीयांची अश्रूंनी झाली गळाभेट

googlenewsNext

कोल्हापूर : सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते. आम्ही कधी रागाला कधी द्वेषाला, कधी आमिषांना, कधी अनैतिक कारणाला बळी पडलो आणि आता बंदिस्त जगात पश्चातापाने होरपळतोय. तुम्ही असे करू नका खूप शिका मोठे व्हा, अशी भावनिक साद घालत बंदिजनांनी आपल्या लहानग्यांची गळाभेट घेतली. 
बापाच्या मायेला पारखे झालेल्या मुलांना कुशीत घेताना डोळ्यातून वाहणा-या अश्रूंनीच त्यांना न्हाऊ घालत कैद्यांनी प्रेमाने भरवलेला घास त्या क्षणी मुलांसाठीही अमृताहूनी गोड होता.  कळंबा कारागृहाच्यावतीने गेल्या वर्षीपासून कारागृहातील बंदींची कुटूंबिय आणि लहान मुलांच्या गळाभेटीचा उपक्रम घेण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी तिसºयांदा हा गळाभेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रुमख पाहूणे म्हणून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील उपस्थित होते. यावेळी कारागृह अधिक्षक शरद शेळके, वरिष्ट तुरुंगाधिकारी हरीष्चंद्र जाधवर, पी. पी. परदेशी, सी. एस. आवळे,आर. एस. जाधव, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव उमेशचंद्र मोरे उपस्थित होते. 

मुलांच्या गळाभेटीसाठी सुमारे अडीचशे कैद्यांनी नावनोंदणी केली होती. आपल्या वडिलांना, आईला आणि आजी आजोबांना भेटण्यासाठी आतुर झालेल्या लहानग्यांनी आई व अन्य कुटुंबीयांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून कळंबा कारागृहासमोर हजेरी लावली होती. कैद्यांच्या कुटुंबीयांची व पाल्यांची शहानिशा करून त्यांना कारागृहात सोडले जात होते. आतमध्ये तयार करण्यात आलेल्या मोठ्या मांडवात येताना आपली मुले दिसली की त्यांना घट्ट मिठी मारून कुशीत बसवून घेताना आलेल्या आनंदाच्या, दु:खाच्या आणि पश्चातापाच्या भावनेला अश्रूंनी वाट करून देत कैद्यांनी मुलांसाठी कॅन्टीमधून घेतलेला खाऊ भरवला. 

आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देत आता सांगून काय उपयोग वेळ निघून गेली, असे म्हणत मुलांना मात्र समंजस व्हा, यंदा दहावीचे वर्ष आहे तर अभ्यास नीट कर असा प्रेमळ सल्ला दिला. तर वर्षानुवर्षे बाबांचा चेहराही न पाहिलेली लहान मुले आपल्या शाळेतल्या गमतीजमतीपासून ते एकमेकातील भांडणे, कुटुंबातील अडचणी, तक्रारी अशा गप्पागोष्टींनी मनातल्या भावनांची पोतडीत रिकामी केली. त्यांची अखंड बडबड आणि निरागस चेहरा डोळ्यात साठवून घेत हे बंदीजन मात्र सुख:दुखाच्या भावनांनी अंर्तमुख झाले होते. सत्तरीला आलेले आजोबा दोन वर्षाच्या नातीला पहिल्यांदा पाहत होते,पासष्ठीतले एक बंदी चार वर्षाच्या पणतूचा प्रेमाने पापा घेत होते. 
दुसरीकडे अजूनही कुटुंबीयांच्या प्रतीक्षेत असलेल्या कैद्यांची नजर आपल्या कुटुंबीयांना पाहण्यासाठी भिरभिरत होती. कारागृह प्रशासनाने कुटुंबीयांसाठी खाऊसह जेवणाची सोय केली होती. मुलं बंदी असलेल्या आई वडिलांच्या ताटात जेवताना गप्पांचा ओघ अखंड सुरू होता. शुक्रवारी एका कैद्याचा वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांनी सर्व बंदिंच्या कुटुंबीयांना केक दिला. 

प्रिय आईस...
या गळाभेट उपक्रमात १० महिला कैदीही होत्या. फसवणूक, हुंडाबळी अशा विविध कारणांनी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या यातील एका महिला कैदीचा मुलगा बहिणीचा हात दुखावल्याने आईच्या भेटीला येऊ शकला नाही. त्यामुळे त्याने आपल्या भावंडांकडून आईला पत्र पाठवले. बहिणीचे औषध पाणी, पाच हजार रुपयांचा दंड, घराची झालेली दुरावस्था मांडत आईला तु आल्यानंतर आपण कोणकोणत्या गोष्टी करुया याचा जणू सल्लाच देत होता. तुझी खूप आठवण येते...या मायन्यानेच त्याने पत्राची सुरवात केली होती.


 

 

Web Title: prisoners meets family members in Kalamba Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.