संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शाहु कुस्ती केंद्राचा मल्ल, जागतिक कास्य पदक विजेता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने अवघ्या दुसऱ्या मिनिटांलाच उपमहाराष्ट्र केसरी भारत मदने याला बॅक थ्रो डावावर अस्मान दाखवून खासबाग केसरीची सहा किलो चांदीची गदा पटकावली. मुख्य पंच संभाजी वरुटे यांनी तो विजयी झाल्याचे घोषित केले.
द्वितीय क्रमांकाच्या लढतीत पैलवान संग्राम पाटील मैदानात न आल्याने त्याच्या ऐवजी भैरु माने याने उमेश चव्हाण विरुद्ध लढतीची तयारी दर्शवली. दोघांत झटापट झाली, मात्र, ती बरोबरीत सोडविली. महाराष्ट्र चॅम्पियन मोईन विरुद्धच्या लढतीतही अजित पाटील ऐवजी आनंदा जाधव यांच्यात कुस्ती झाली. ८ वाजून १९ मिनिटांनी सुरु झालेल्या दाेघांतील लढतीत मोईनने आनंदावर ताबा मिळवत घुटना डाव टाकण्याचा केलेला प्रयत्न फसला. त्यावर पुन्हा त्याने एकचाक डावावर आनंदाला पराभूत केले. महाराष्ट्र चॅम्पियन ओमकार भातमारे याने महाराष्ट्र चॅम्पियन उदय शेळके याला पराभूत केले. किरण जाधव विरुद्ध सुशांत तांबूळकर, आंतरराष्ट्रीय पदक विजेता सोनबा गोंगाणे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन नाथा पोवार तसेच महाराष्ट्र चॅम्पियन अरुण बोंगर्डे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन राघू ठोंबरे यांच्यातील लढती बरोबरीत सोडवण्यात आल्या.