पावसासह वाऱ्याचा वेग व दिशा समजणारा प्रकल्प सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:14+5:302021-07-08T04:17:14+5:30
संजय पारकर- लोकमत न्यूज नेटवर्क, राधानगरी : विविध कारणांसाठी अत्यावश्यक असलेल्या पावसाची मोजणी करण्याची पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा ...
संजय पारकर- लोकमत न्यूज नेटवर्क,
राधानगरी : विविध कारणांसाठी अत्यावश्यक असलेल्या पावसाची मोजणी करण्याची पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा झाली आहे. पावसाबरोबर आर्द्रता, तापमान, वाऱ्याचा वेग व दिशा याची दर दहा मिनिटांला अचूक माहिती देणारा अत्याधुनिक व स्वयंचलित महावेद प्रकल्प शासनाने सुरू केला आहे. राज्यातील महसूल मंडलनिहाय २१०५ ठिकाणी अशी स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली आहेत.
या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे संकलित झालेल्या माहितीच्या आधारेच हवामान आधारित पंतप्रधान पीक विमा योजनेतील नुकसानभरपाई दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात ७६ ठिकाणी अशी केंद्रे सुरू केली आहेत. काही महसूल मंडल मुख्यालयाच्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी लगतच्या गावात त्याची उभारणी केली आहे. त्याची देखभाल करण्यासाठी स्कायमॅट वेदर सर्विसेस या कंपनीची नेमणूक केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर २०१७ मध्ये याची सुरवात झाली. गेल्या वर्षीपर्यंत पावसाची माहिती दोन्ही प्रकारे संकलित केली जात होती. मात्र, यावर्षी जुन्या प्रकारे होणारे संकलन बंद करण्यात आले आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग व स्कायमॅट वेदर सर्विसेस या खासगी कंपनीच्या सहभागातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पाच मीटर बाय सात मीटर एवढ्या मोकळ्या जमिनीत या प्रकल्पाची उभारणी केली आहे. मधे एक खांब आहे. त्यावर याचे पाच पॅरामीटर आहेत. त्यातून पाऊस, आर्द्रता, तापमान, वाऱ्याचा वेग व दिशा याची सेन्सरद्वारे नोंद होते. याला सोलर पॅनल व चार्ज होणारी बॅटरी आहे. सूर्यप्रकाश नसला तरी दहा दिवस चालेल एवढी बॅटरीची क्षमता आहे. यात संकलित होणारी ही सर्व माहिती दर दहा मिनिटांला पुण्यातील कृषी आयुक्तालयातील मुख्य सर्वरला नोंद होते. जिल्हा पातळीवर कृषी अधीक्षक अधिकारी यांनाच ती पाहता येते.
पारंपरिक पद्धत झाली बंद..
पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या पर्जन्य मोजणीतून स्थानिक पातळीवर याची माहिती मिळत होती. मात्र, ती आता बंद झाली आहे. त्यासाठी स्कायमॅट वेदर हे मोबाइल अॅप स्थापित करणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभागाच्या मोठ्या धरणांच्या ठिकाणी मात्र पारंपरिक पद्धतीनेच पावसाची मोजणी केली जाते.
०७०७२०२१-कोल-वेदर फोटो
राज्य शासन कृषी विभाग व स्कायमॅट वेदर सर्विसेस यांच्या सहभागातून प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी अशा प्रकारची स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली आहेत. बामणी (ता. कागल) येथे उभारण्यात आलेले हवामान केंद्र.