‘गोकुळ’चा प्रचार उरला सहा दिवसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:23 AM2021-04-25T04:23:35+5:302021-04-25T04:23:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ‘गोकुळ’चा प्रचार शिगेला पोहोचला असून, ठरावधारकांच्या गाठीभेटीसह इतर घडामोडी वेगावल्या आहेत. प्रचारासाठी अवघे सहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’चा प्रचार शिगेला पोहोचला असून, ठरावधारकांच्या गाठीभेटीसह इतर घडामोडी वेगावल्या आहेत. प्रचारासाठी अवघे सहा दिवसच राहिल्याने उमेदवारांसह नेत्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
‘गोकुळ’ दूध संघासाठी सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडी व विरोधी राजर्षि शाहू शेतकरी आघाडीमध्ये सरळ लढत होत आहे. दोन्ही आघाड्यांनी तगडे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. उमेदवारांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. तर नेत्यांच्या जोडण्यांना वेग आला आहे. नाराज गटांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असून, उघड नसेना छुपे पाठबळ देण्याची विनंतीही केली जात आहे. प्रचार ३० एप्रिल रोजी संपणार असल्याने केवळ सहा दिवसच राहिले आहेत. त्यामुळे हालचाली गतिमान झाल्या आहेत.
भांडवली गुंतवणुकीने ठरावधारक खुसखुशीत
गेली महिना-दीड महिना ‘गोकुळ’चा प्रचार सुरू आहे. त्यात ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यांनी तर गाठी-भेटींचा धडाकाच लावला होता. त्यातून एका एका ठरावधारकांकडे तीन-चार वेळा उमेदवार पाेहोचले आहेत. त्याचबरोबर सर्वच ठरावधारकांना दोन्हीकडून भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाल्याने ते खुसखुशीत दिसत आहेत.
दोन दिवसात मतदान केंद्रे निश्चित होणार
जिल्ह्यात ३५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्याचे नियोजन आहे. प्रत्येक केंद्रावर १०० ते १२५ मतदान होणार आहे. त्यानुसार तालुक्यातील मोठ्या शाळा, महाविद्यालयांची निवड केली जात असून, एक-दोन तालुक्यातील केंद्रांची नावे निश्चित व्हायची आहेत. उद्या, सोमवारी हे केंद्रे निश्चित होणार असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.