कोल्हापूर : कोविड संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास तसेच रुग्णांवर तातडीने उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे निदान आणि उपचार लगेच कसे सुरू होतील यावर लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करावयाच्या आहेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात व शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी कोविड-१९ राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हा टास्क फोर्स, शासकीय व खासगी कोविडवर उपचार करणारे डॉक्टर यांना व्हिसीद्वारे मार्गदर्शन केले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होते.
या व्हिसीमध्ये राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष साळोखे, डॉ. डी. बी. कदम, डॉ. कपिल झिरपे यांनी गृहअलगीकरणातील रुग्ण, कोरोना केअर सेंटर व खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करावयाचे याचे मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हयातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी कोविड रुग्णांवर उपचार व कोविड मृत्यू कमी करण्यासाठी करावयाच्या उपचाराबाबत आपल्या शंका उपस्थित केल्या. डॉक्टरांनी विचारलेल्या शंकांचे निरसन टास्क फोर्सच्या तज्ञांनी केले.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी टास्क फोर्सचे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय टास्क फोर्स, शासकीय व खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बैठकीस ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी उप-आयुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-केएमसी०२
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या पुढाकाराने सोमवारी कोल्हापुरातील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना राज्यस्तरीय तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसीद्वारे मार्गदर्शन केले.