शाहू महाराजांविरुद्ध प्रचार म्हणजेच भाजपचा महाराष्ट्र द्वेष - आदित्य ठाकरे
By संदीप आडनाईक | Published: April 28, 2024 09:32 PM2024-04-28T21:32:56+5:302024-04-28T21:33:49+5:30
आदित्य ठाकरे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोल्हापूर : शाहू महाराजांविरुद्ध प्रचार करणे यातूनच भाजपचा महाराष्ट्र द्वेष दिसून येत आहे, अशा शब्दात उध्दवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली.
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात कितीही ठाण मांडले तरी जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहील असे सांगून आदित्य यांनी भाजपला लोकशाही संपवायची आहे, त्यांचे पहिले लक्ष्य संविधान बदलणे आहे, हेही देशातल्या लोकांना माहित आहे. आदित्य ठाकरे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, महाराष्ट्रात जे काही चालले आहे, त्यावरुन भाजपचे सारे काही गुजरातसाठी सुरु आहे. गुजरातमधील कांदा निर्यात बंदी प्रथमत: हटवली आणि त्यानंतर देशातील कांदा निर्यात बंदी हटवायला ४८ तास लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात झाली असली तरीही आमची मते दुप्पट होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुवाहटी आणि गोव्याला जाउन जे रडगाणं गायले आणि पळाले, त्या गद्दारांकडे मी लक्ष देत नाही. माझ्या आजोबांचे नाव घेत त्यांची बरोबरी करण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांना त्यांची नाव घेण्याचीही लायकी नाही. जॉईन आणि जेल पॉलिसीमुळे ते पळाले, पण संजय राऊत यांच्यासारखे नेते जेलमध्ये गेले तरीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. टाटा काय बोलले हे माहित नाही, पण गेल्या अडीच वर्षात दिल्लीतून आलेले अनेक फोन कॉलनंतर सगळे उद्योग गुजरातला जायला लागले हेसुध्दा खरं आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांचा एकही नवा उद्योग राज्यात आला का असा प्रश्न त्यांनी विचारला.
गेल्या पाच वर्षात महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. कुठेही सरकार आहे असे जाणवत नाही असे ते म्हणाले.